Coronavirus Research: भारतातील 4 राज्यांमधील वटवाघूळांमध्ये आढळला कोरोना व्हायरस; याआधी Bat द्वारेच झाले होते निपाहचे संक्रमण
Representational Image (Photo Credits: Pxhere)

संपूर्ण जगाला संकटात टाकणारा कोरोना व्हायरस (Coronavirus) प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत कसा पोहचला, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये दुमत असू शकते. परंतु आता देशातील केरळ, हिमाचल, तामिळनाडू आणि पुडुचेरीमधील वटवाघूळांमध्ये (Bat) कोरोना व्हायरस आढळले आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की बॅटमध्ये आढळणारा विषाणू कोविड 19 हा सार्स सीओव्ही 2 सारखा असू शकतो मात्र अजून यावर पुढील अभ्यास होणे बाकी आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या या संशोधनात 10 पैकी 4 राज्यांत बॅटमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे. त्याचबरोबर कर्नाटक, चंदीगड, ओडिशा, पंजाब, गुजरात, तेलंगणा या इतर 6 राज्यांमधून घेतलेले नमुने नकारात्मक आले आहे.

तपासणीमध्ये वटवाघूळांच्या दोन प्रजातींमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला आहे. या Rousettus आणि Pteropus प्रजाती केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी आणि तामिळनाडू येथे आढळतात. वटवाघूळ हे अनेक विषाणूंकरिता एक नैसर्गिक जलाशय मानला जातो. बरेच प्रकारचे व्हायरस बॅटमध्ये राहतात आणि वेळोवेळी ते मानवांसाठी घातक ठरले आहेत. केरळमध्ये यापूर्वी 2018 आणि 2019 मध्ये निपाह विषाणूसाठी Pteropus बॅटची प्रजाती सकारात्मक आढळली होती.  (हेही वाचा: रस्त्यावर थुंकाल तर खबरदार! लॉकडाऊन कालावधीत केंद्रीय गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्व जारी)

वैद्यकीय संशोधनाच्या भारतीय संशोधन पेपरात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात असा दावा केला गेला आहे की, या वटवाघूळामध्ये आढळणारा हा विषाणू मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो असा कोणताही पुरावा किंवा संशोधन नाही.  पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या संशोधक डॉ. प्रज्ञा डी यादव यांच्या मते, केरळ, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी आणि तमिळनाडू येथील 25 वटवाघुळांमध्ये कोरोना विषाणूचा सापडला आहे. मात्र अजूनतरी यामुळे मानवजातीला धोका उद्भवेल याबाबतची शक्यता अथवा पुरावा सापडला नाही.