Air Pollution Drop in India due to Lockdown (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतात कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत घट झाली आहे. गेल्या चार दशकात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घट पाहायला मिळत आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअर यांच्या अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम कोळसा आणि तेलाच्या वापरावरही झाला आहे. मार्च 2020 अखेरपर्यंत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन सुमारे 30 दशलक्ष टनाने कमी झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील चार दशकातील ही लक्षणीय घसरण आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लिन एअरचे विश्लेषक सुनील दहीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 पर्यंत तेल आणि कोळसा वापरात 4.3% घट झाल्याचे दिसून आले. कोळसा आयातीत 3.2% वाढ झाली असून कोळसा वितरणात मात्र एकूण 2% घट झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक वर्षांत वापर केवळ 0.2% वाढला. मागील 22 वर्षातील ही सर्वात कमी वाढ आहे. तर गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत कच्चा तेलाचे उत्पादन 5.9 % कमी झाले आहे. याचबरोबर नैसर्गिक वायू आणि प्रक्रीया केलेल्या कच्चा तेलाची मागणी, उत्पादनही घटले आहे. 2018-2019 च्या तुलनेत कच्चा तेलाचा वापर 1.1 % घटला असून नैसर्गिक वायू उत्पादन 5.2% कमी झाले आहे. (Coronavirus: लॉकडाउनमुळे दिल्लीसह अन्य महानगरांमधील वायुप्रदुषणात 25 टक्क्यांनी घट)

भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 70 हजारच्या वर गेला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा लवकरच होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनचा 4 चा कालावधी आणि स्वरुप येत्या 18 मे पूर्वी देशवासियांना कळणार आहे.