भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) कोरोनावर मात करून पुन्हा नव्याने उभारी घेत असल्याचे दिसत आहे. सरकारने मंगळवारी, 30 नोव्हेंबर रोजी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या GDP ची आकडेवारी जाहीर केली. देशाचा जीडीपी जुलै-सप्टेंबर तिमाहीत -7.4% वरून 8.4% पर्यंत वाढला आहे. जून तिमाहीत भारताचा जीडीपी 20.1 टक्के होता. जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था आतापर्यंतच्या सर्वात जलद गतीने वाढली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, गेले आर्थिक वर्ष 2020-21 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP वृद्धी दरात 7.4 टक्के घट झाली.
आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी जुलै-सप्टेंबर तिमाहीत सुमारे 35.73 लाख कोटी रुपये होता. 2020-21 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत हा आकडा 32.97 लाख कोटी रुपये होता म्हणजेच या वर्षी त्यात 8.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जुलै-सप्टेंबरमध्ये भारताचा विकास दर 7.9 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता, म्हणजेच वास्तविक विकास दर त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. ही सलग चौथी तिमाही आहे जेव्हा भारताचा विकास दर सकारात्मक राहिला आहे. 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर 0.5 टक्के होता, तर चौथ्या तिमाहीत तो 1.6 टक्के होता. 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत विकास दर 20.1 टक्के होता.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्या तिमाहीत अशी अनेक चिन्हे दिसली आहेत जी अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचे दर्शवतात. दुसऱ्या तिमाहीत, कोळशाच्या उत्पादनात 15.7 टक्के वाढ झाली, तर सिमेंट उत्पादनात 22.3 टक्के, तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 24.5 टक्के वाढ झाली. याशिवाय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत 108 टक्क्यांनी वाढ झाली असून बँक ठेवी आणि कर्जातही वाढ झाली आहे. हे सर्व संकेतक अर्थव्यवस्थेत वेगवान सुधारणा दर्शवत आहेत. (हेही वाचा: सलग 26 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर)
एकूणच, आगामी काळात देशाची आर्थिक वाढ चांगली राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट यामध्ये अडथळा ठरू शकते. कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या बातम्यांमुळेही चिंता वाढली आहे. यासोबतच वाढती महागाईही सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय आहे. आता येत्या तिमाहीत जीडीपीची वाढ चांगली राहील की नाही हे पाहावे लागेल.