मिझोराम (संग्रहित संपादित प्रतिमा)

मिझोराम (Mizoram) हे देशातील सर्वात आनंदी राज्य (Happiest State) ठरले आहे. गुरुग्रामच्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील रणनीतीचे प्राध्यापक राजेश के पिलानिया यांनी त्यांच्या अभ्यासात असा दावा केला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, मिझोरामची सामाजिक रचना तरुणांना आनंददायी आहे. अहवालानुसार, 100 टक्के साक्षरता प्राप्त करणारे मिझोराम हे भारतातील दुसरे राज्य आहे. मिझोराम आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही वाढण्याची संधी देते.

मिझोराम हॅपीनेस इंडेक्स 6 पॅरामीटर्सवर आधारित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये कौटुंबिक संबंध, कामाशी संबंधित समस्या, सामाजिक समस्या, धर्म, आनंदावर कोरोनाचा परिणाम, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे.

अहवालात म्हटले आहे की, मिझोरामच्या आयझॉलमधील सरकारी मिझो हायस्कूल (जीएमएचएस) च्या एका विद्यार्थ्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याच्या वडिलांनी तो लहान असतानाच त्याचे कुटुंब सोडून दिले होते. यानंतरही मुलाच्या आशा कमी झाल्या नाहीत. सध्या तो अभ्यासात चांगली कामगिरी करत आहे व त्याला चार्टर्ड अकाउंटंट किंवा नागरी सेवा परीक्षेला बसायचे आहे. हे इथल्या शिक्षण व्यवस्थेमुळे शक्य झाले.

इथल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम शिक्षण मिळत असून, शिक्षक अतिशय चांगले असल्याचे सांगितले आहे. तसेच, येथे अभ्यास करण्यासाठी पालकांचा दबाव देखील कमी आहे. मिझोराममधील शिक्षक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी नियमितपणे भेटतात. (हेही वाचा: Government Jobs 2023: सरकारी नोकरीची संधी! पदे, पदसंख्या, कसा आणि कुठे कराल अर्ज? घ्या जाणून)

मिझोरामची सामाजिक रचना देखील तरुणांच्या आनंदात महत्वाची भूमिका बजावते. अहवालात पुढे म्हटले आहे की, मिझो समुदायातील प्रत्येक मूल, भलेही त्याचे लिंग काहीही असो, तो लवकर कमाई करू लागते. राज्यात कोणतेही काम छोटे मानले जात नाही. साधारणपणे 16 किंवा 17 वर्षांच्या आसपास तरुणांना रोजगार मिळतो. राज्यात मुली आणि मुलगा असा भेदभाव नाही.