Economic Inequality: देशातील गरिबांचे उत्पन्न 53 टक्क्यांनी घटले; तर श्रीमंतांच्या उत्पन्नात 39 टक्के वाढ; देशातील आर्थिक विषमता शिगेला
India Economic | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम गरीब वर्गावर झाला आहे. आकडेवारीनुसार, त्यांच्या उत्पन्नात (Income) 53 टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे श्रीमंतांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक उदारीकरणानंतर सर्वात गरीब 20 टक्के भारतीय कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1995 पासून सातत्याने वाढत होते, परंतु कोरोना कालावधी म्हणजेच 2020-21 मध्ये 2015-16 च्या तुलनेत ते 53 टक्क्यांनी घटले आहे. याच पाच वर्षांच्या कालावधीत, सर्वात श्रीमंत 20 टक्के लोकांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नात 39 टक्के वाढ झाली आहे.

मुंबईस्थित थिंक टँक, पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी (PRICE) च्या ICE360 सर्वेक्षण 2021 सर्वेक्षणात हे समोर आले आहे. हे सर्वेक्षण एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान झाले. त्यात पहिल्या फेरीत 200,000 घरे आणि दुसऱ्या फेरीत 42,000 घरे समाविष्ट होती. हा अहवाल 100 जिल्ह्यांतील 120 शहरे आणि 800 गावांमधून गोळा केलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

या अहवालात असे दिसून आले आहे की या महामारीचा शहरातील गरीब लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे, त्यांचे उत्पन्न या कालावधीत जवळपास संपले आहे. सर्वेक्षणात उत्पन्नाच्या आधारे लोकसंख्येची पाच भागात विभागणी करण्यात आली आहे. प्रथम सर्वात गरीब 20 टक्के लोकसंख्या, येथे उत्पन्न 53 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. दुसरे मध्यमवर्गीयांचे उत्पन्न 32 टक्क्यांनी घटले आहे. तिसरे, ही घट मध्यम-उत्पन्न गटासाठी 9 टक्के आहे, चौथी म्हणजे उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सात टक्के वाढ आणि सर्वात श्रीमंत 20 टक्के लोकांसाठी 39 टक्के वाढ आहे. (हेही वाचा: 'हे' खाते उघडून तुमच्या पत्नीला बनवा आत्मनिर्भर, दरमहा मिळतील 45 हजार रुपये)

सर्वेक्षणानुसार, असेही आढळून आले आहे की 1995 मध्ये सर्वात श्रीमंत 20 टक्के लोकांचे उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या 50.2 टक्के होते, परंतु 2021 मध्ये त्यांचा वाटा वाढून 56.3 टक्के झाला. दुसरीकडे, सर्वात गरीब 20 टक्के लोकांचा वाटा 5.9 टक्क्यांवरून 3.3 टक्क्यांवर घसरला. शहरांमध्ये गरिबांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर 2016 मध्ये 90 टक्के गरीब 20 टक्के गावांमध्ये होते. 2021 मध्ये ही संख्या 70 टक्क्यांवर घसरली. दुसरीकडे शहरी भागातील सर्वात गरीब 20 टक्के लोकांचा वाटा सुमारे 10 टक्क्यांवरून वाढला आहे.