मुंबई पोलिस क्राईम ब्रांच (Mumbai Police Crime Branch) कडून आज माजी मंत्री आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique ) यांच्या हत्येप्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीट मध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या ते अभिनेते सलमान खान याच्या निकटवर्तीयांपैकी एक होते यामुळे झाल्याची माहिती दिली आहे. ही चार्जशीट 26 जणांविरूद्ध आहे. त्यामध्ये अनमोल बिष्णोई, त्याचा भाऊ गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा समावेश आहे. बिष्णोई गॅंगला मुंबई मध्ये दहशत निर्माण करायची होती त्या उद्देशातून हा हल्ला करण्यात आला आहे असं म्हटलं आहे.
पोलिस अधिकार्यांच्या माहितीनुसार, 4590 पानी चार्जशीट आहे. हे आज Special Maharashtra Control of Organised Crime Act कोर्टात दाखल करण्यात आले आहे. चार्जशीट मध्ये शुभम लोणकर, यासिन सिद्दीकी आणि अनमोल बिष्णोई यांच्या नावाचा उल्लेह आहे. यूएस इमिग्रेशन अथॉरिटी कडून बिष्णोईला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर पासपोर्ट मध्ये अफरातफर केल्याची माहिती दिली आहे. सध्या अनमोल बिष्णोई पोलिसांच्या ताब्यात आहे. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावला 'मोक्का' .
12 ऑक्टोबर 2024 दिवशी दसराच्या रात्री वांद्रे पूर्व भागात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी च्या ऑफिसबाहेर हा हल्ला झाला. त्यानंतर मुख्य शूटर घटनास्थळावरून पळाला मात्र क्राईम ब्रांचने त्याला अटक केली. या प्रकरणी सध्या 26 जण अटकेत आहेत.
पोलिसांच्या चार्जशीट नुसार, सलमान खानचा निकटवर्तीय असल्याने बाबा सिद्दीकी त्यांच्या निशाण्यावर होते. बिष्णोई समाजाच्या रडार वर सलमान मागील अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींना लक्ष्य करण्यामागे त्यांची दाऊद इब्राहिम याच्याशी असलेली जवळीक देखील कारणीभूत आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) प्रकल्पांवरील काही वादातून सिद्दीकीची हत्या झाल्याच्या दाव्यावर गुन्हे शाखेला कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. असेही त्यांनी म्हटलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकींवरील हत्येमागे अनमोल बिष्णोईचा हात होता. आरोपींनी आपल्या गुन्हेगारी कारवायांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा कट रचला होता, हिंसा आणि दहशतीचा वापर करून आपले ध्येय साध्य केल्याचं पोलिस म्हणाले आहेत.