Photo- X/@imvivekgupta

Kaithal Shocker: हरियाणातील कैथल जिल्ह्यात एका व्यक्तीने कारमध्ये पाच जणांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिका धान्य बाजारात शनिवारी ही घटना घडली. जिथे कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच तरुणांना धडक दिली. ही संपूर्ण घटना अवघ्या 5 सेकंदात घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका दुकानाबाहेर पाच तरुण खुर्च्यांवर बसून बोलत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तेथे पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याने पाच जणांना चिरडले.

दोन तरुणांची प्रकृती चिंताजनक

ही धडक इतकी जोरदार होती की, तीन तरुण जागीच कोसळले, तर दोघांना कारने पुढे खेचले. त्याचवेळी एक तरुण सुमारे १०० मीटर पर्यंत कारच्या बोनेटवर लटकला. अपघातानंतर तेथे उपस्थित नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हाताळल्यानंतर त्यांनी कारमधील दोन तरुणांना पकडले. जखमींना चिका येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी सांगितले की, दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात कसा झाला?

कार चालवणारा तरुण धान्य बाजारात गाडी चालवायला शिकत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सीलरेटरवर गेल्याने कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले.