Kite String Accident: पतंग उडवताना दोरी म्हणून मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी असली तरी अनेक ठिकाणी त्याचा बेकायदेशीर वापर केला जातो. ज्यामुळे अनेक नागरिकांचा हाकनाक बळी जातो. मेरठ (Meerut News) येथील एका दुचाकीस्वाराचा असाच मृत्यू झाला. वय वर्षे केवळ 21 असलेला सोहेल नामक तरुण आपल्या दुचाकीवरुन निघाला असता, रस्त्यावरुन जाताना पतंगाच्या माजामुळे गळा चिरल्याने (Nylon Kite String Slashes Throat) त्याचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार दुचाकीवरुन घरी परतत असलेल्या सोहेल रस्त्याने निघाला असता दोन झाडांदरम्यान अडकलेल्या धारधार मांजा त्याच्या गळ्याला गुंडाळला गेला आणि त्याचा मृत्यू झाला, असे वृत्त आहे. सांगितले जात आहे की, त्याला झालेली जखम इतकी भयावह होती की, त्याचा गळ्याचा अर्ध्याहून अधिक भाग चिरला गेला.
मित्र थोडक्यात बचावला पण नाक चिरले
धक्कादायक असे की, मांजा गळ्यात अडकल्याने सोहेल याची दुचाकी रस्त्यावरुन घसरली. ज्यामुळे अपघात घडला. त्याच वेळी त्याच्या पाठिमागे बसलेला मित्र नवाझीश यासही गंभीर दुखापत झाली. मांजा कापल्याने त्याच्याही नाकाला खोलवर जखम झाली. त्याचे नाक जवळपास निम्म्यापर्यंत चिरला गेला. (हेही वाचा, Mumbai News: मुंबईत मांजामुळे एकीकडे तरुणाचा बळी, तर दुसरी कडे महिलेची हनुवटी कापली)
एक ठार दुसरा जखमी
अपघाताची घटना घडल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यातील सोहोल याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी उपचारापुर्वीच घोषीत केले. दुसऱ्या बाजूला नवाझीश याचे प्राण वाचविण्यात यश आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, अपघाताच्या घटनास्थळावरुन पोलिसांनी चिनी मांजाचे बंडल जप्तकेले आहे. दरम्यान, हा मांजा या दोन्ही मित्रांनी स्वत:साठी खरेदी केला होता की, इतरांसाठी ते वाहतूक करत होते की, दुसऱ्या कोणाचा तरी मांजा या ठिकाणी पडला होता आणि ज्यात अडकून हा अपघात घडला? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्याची उकल पोलीस तपासादरम्यान करत आहेत.
कायदेशीर आणि सुरक्षिततेची चिंता
पतंग मांजा हा एक प्रकारचा धागा आहे. जो एखाद्या काचेच्या तारेसारखा असतो आणि तो पतंग उडविण्यासाठी वापरला जातो, विशेषतः दक्षिण आशियामध्ये. हे गोंद आणि पिचलेल्या काचेच्या मिश्रणाने लेपित कापसाच्या धाग्यापासून बनविलेले आहे, ज्यामुळे ते आश्चर्यकारकपणे मजबूत आणि तीक्ष्ण बनते. या धारदारपणामुळेच पतंग उडवणाऱ्यांना इतर पतंगांचे धागे हवेत "कापता" येतात, मकर संक्रांतीसारख्या सणांमध्ये ही प्रचलित प्रथा आहे. पतंग मांजा या खेळात उत्साह वाढवतो, तर त्यात लक्षणीय जोखीम देखील आहेत:
- मानवांना इजा: तीक्ष्ण आणि धारधारता असल्याने चिरले जाण्याची आणि जखम होण्याची शक्यता असते. विशेषत: मोटरसायकलस्वार आणि सायकलस्वार ज्यांचे गळे चिरले जाऊ शकतात.
- प्राण्यांना होणारे नुकसान: पक्ष्यांवर, विशेषतः, गंभीरपणे प्रभावित होतात. अनेक जण तारांमध्ये अडकले किंवा धारदार धारांमुळे त्यांना जीवघेणा जखमा झाल्या. अनेकदा पक्षी, प्राणी कापले गेल्याने दगावलेही आहे.
मांजा वापराचे धोके विचारात घेतल्याने अनेक देशात आणि राज्यांमध्ये पतंग मांजाच्या वापरावर बंदी किंवा निर्बंध घातले आहेत. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंतच्या दंडासह कठोर दंड भरावा लागतो.