Infosys building. (Photo Credit: Wikimedia Commons)

Infosys Salary Hike Deferred: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) चालू आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच, जानेवारी-मार्च पर्यंत कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ पुढे ढकलली आहे. कंपनीने शेवटची पगारवाढ नोव्हेंबर 2023 मध्ये लागू केली होती. साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीला पगारवाढ लागू केली जाते. इन्फोसिसचा पगारवाढीचा हा विलंब जागतिक मागणी वातावरणातील व्यापक अनिश्चितता प्रतिबिंबित करतो.

कमकुवत डिस्क्रेशनरी खर्च, विलंबित क्लायंट बजेट आणि चालू असलेल्या व्यापक आर्थिक अनिश्चिततेमुळे आयटी कंपन्यांवर दबाव आहे. इन्फोसिसचे प्रतिस्पर्धी HCLTech, LTIMindtree आणि L&T Tech Services यांनीही खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि नफा राखण्यासाठी दुसऱ्या तिमाहीत पगारवाढ वगळली.

इन्फोसिसने 17 ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, ते चौथ्या तिमाहीत टप्प्याटप्प्याने पगारवाढीची योजना आखत आहेत. त्याचा काही भाग जानेवारीमध्ये आणि उर्वरित एप्रिलमध्ये प्रभावी होईल, असे मुख्य वित्तीय अधिकारी जयेश संघराजका यांनी Q2 निकालानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. जुलै-सप्टेंबर 2024 तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा तिमाही-दर-तिमाही 2.2 टक्क्यांनी वाढून 6,506 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. मुख्यतः कमी ऑनसाइट खर्च, चांगला वापर दर आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे मार्जिन 10 बेस पॉईंट्सने सुधारले आहे. (हेही वाचा: Google Layoffs: गुगलमध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम)

पगारवाढ नसतानाही डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचे मार्जिन कमी होईल, असे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या प्री-अर्निंग नोटमध्ये म्हटले आहे. सुट्ट्यांमुळे कामाचे दिवस कमी असल्याने असे होणार आहे. मात्र, प्रायजिंग गेन, सबकॉन्ट्रॅक्टर कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणि प्रोजेक्ट मॅक्सिमस द्वारे हे ऑफसेट केले जाईल. प्रोजेक्ट मॅक्सिमस ही इन्फोसिसची मार्जिन सुधारणा योजना आहे ज्याचा उद्देश खर्च ऑप्टिमायझेशन आहे.