भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोनाशी (Covid-19) लढणाऱ्या इंट्रानेजल लसीला (Intranasal Vaccine) केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून (CDSCO) मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी भारतातील आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी हेट्रोलॉगस बूस्टरसाठी मिळाली आहे. हेट्रोलॉगस बूस्टर म्हणजे कोविडशील्ड किंवा कोवॅक्सीनचा डोस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही विशेष इंट्रानेजल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.
भारत बायोटेक कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या विशिष्ट लसीची फेज III क्लिनिकल चाचणी देखील केली गेली होती, जी यशस्वी झाली. कंपनीने सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांचेही मूल्यांकन करण्यात आले. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी अलीकडेच सांगितले होते की, फर्मने सुमारे 4,000 स्वयंसेवकांवर अनुनासिक लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि आतापर्यंत साइड इफेक्टचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही.
याशिवाय, ते म्हणाले की, ही नाकातून घेण्यात येणारी लस प्राथमिक दुसरा डोस आणि हेट्रोलॉगस बूस्टर डोस म्हणून वापरली जाऊ शकते. जगभरातील वैज्ञानिक समुदाय आणि कोविड लस तयार करणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. याशिवाय, ते म्हणाले की, कोविड लसीची मागणी कमी झाली असली तरी, तरीही आम्ही सतत अंतर्गत लस तयार करत आहोत जेणेकरुन भविष्यातील आजारांसाठी तयार राहता येईल. (हेही वाचा: सौम्य तापामध्ये Antibiotics घेणं टाळा; आयसीएमआर ची जाणून घ्या नवी नियमावली)
दरम्यान, भारत बायोटेकने दावा केला आहे की, इंट्रानेजल लस व्यापक रोगप्रतिकारक प्रतिसादास उत्तेजन देते आणि कोविड-19 चे संक्रमण रोखण्याची क्षमताही त्यात आहे. 6 सप्टेंबर रोजी, DCGI ने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी इंट्रानेजल कोविड लस iNCOVACC मंजूर केली होती. ही लस दोन डोसमध्ये दिली जाईल. दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील.