Digital Transactions (PC -pixabay)

Union Budget 2021: आज या वर्षातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान क्षेत्रासह जवळपास प्रत्येक क्षेत्राची दखल घेऊन घोषणा करण्यात आल्या. 2021 च्या अर्थसंकल्पात, मोबाइलच्या वाढलेल्या किंमतींमुळे लोक थोडे निराश झाले. या अर्थसंकल्पात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना लोकांना डिजिटल व्यवहारात अधिक सूट आणि लाभ मिळेल, असं सांगितलं.

यासंदर्भात अधिक बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 1,500 कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव ठेवत आहोत. जे डिजिटल व्यवहारांना आर्थिक गती देईल. कोरोना कालावधीत डिजिटल व्यवहाराचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता केवळ मोठे स्टोअर किंवा शोरूमच नाही तर फुटपाथ विक्रेतेही डिजिटल व्यवहार करत आहेत. सरकारच्या घोषणेनुसार डिजिटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना 50 ते 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. परंतु, यासाठी किमान एक रुपयाचा व्यवहार आवश्यक आहे. (वाचा -Rahul Gandhi On Budget 2021: मोदी सरकारने भारताची मालमत्ता काही उद्योगपती मित्रांकडे सोपवायची योजना आखली आहे; केंद्रीय अर्थसंकल्पावर राहुल गांधी यांचा निशाणा)

विशेष म्हणजे फुटपाथ विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांवर दरमहा 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतात. याशिवाय फुटपाथ विक्रेत्यांना डिजिटल व्यवहाराची जाणीव करून देण्यासाठी विशेष डिजिटल मोहीम सुरू करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना वर्षाकाठी 1200 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकतात.

दरम्यान, बजेट 2021 मध्ये डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे स्मार्टफोनच्या किंमती वाढविण्याचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले की, स्मार्टफोनवरील कस्टम ड्युटीमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून नवीन कस्टम ड्यूटी 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल. त्यानंतर विदेशातून भारतात आयात होणाऱ्या स्मार्टफोनची किंमत वाढेल.