Rahul Gandhi On Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने भारताची मालमत्ता काही उद्योगपती मित्रांकडे सोपवायची योजना आखली आहे, अशा आशयाचं ट्विटर राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सरकार लोकांच्या हातात पैसे देण्याच विसरलं आहे. मोदी सरकारची योजना भारताची संपत्ती आपल्या भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची आहे. राहुल गांधी यांनी बजेटमध्ये कोणत्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा, यासंदर्भात ट्विट केलं होतं. यात त्यांनी रोजगार निर्मितीसाठी एमएसएमई, शेतकरी आणि कामगार यांना पाठिंबा द्यावा, जीव वाचवण्यासाठी आरोग्यसेवेवरील आणि संरक्षणासाठी संरक्षण खर्च वाढवावा, अशी मागणी केली होती. (वाचा - Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला सर्वसाधारण अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला किती कोटी रुपये मिळाले जाणून घ्या)
सर्वसाधारण अर्थसंकल्पात मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वित्तीय संस्थांच्या भागभांडवलातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुढील आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा कंपनीत आपला हिस्सा विकण्याचा सरकारचा मानस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, पुढच्या आर्थिक वर्षात आयडीबीआय बँक, बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन, नीलाचल इस्पात निगम लिमिटेड आणि इतर कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक केली जाईल.
Forget putting cash in the hands of people, Modi Govt plans to handover India's assets to his crony capitalist friends.#Budget2021
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2021
केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यासंदर्भात मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करत आहे. बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. परंतु, हा अर्थसंकल्प आम्हाला निराशा करणारा आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत' अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.