Apple Reduces iPhone Prices: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्मार्टफोन ग्राहकांना मोठा दिलासा दिला. मोबाईल फोन, पार्ट्स आणि चार्जर यांसारख्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी केल्याची घोषणा त्यांनी केली. अर्थमंत्र्यांनी नागरिकांना जी ही भेट दिली, त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. ॲपलने आयफोनच्या (Apple iPhone) किमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही आयफोनचे अनेक मॉडेल्स स्वस्तात खरेदी करू शकता. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयातित स्मार्टफोनवरील शुल्क 5 टक्क्यांनी कमी केले आहे. अर्थमंत्र्यांनी बेसिक कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवरून 15 टक्के केली आहे.
भारत सरकार परदेशातून आयात होणाऱ्या मोबाईल फोनवर 20 टक्के आयात शुल्क लावते, ते आता 15 टक्के करण्यात आले आहे. भारतामध्ये आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्ससह आयफोनचे इतर काही मॉडेल आयात केले जातात.
आता ॲपलने भारतात आपल्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती 3 ते 4 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. टेकक्रंचच्या मते, यामुळे अनेक मॉडेल्सच्या आयफोनच्या किमतीत 6,000 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. आयफोन 13, 14 आणि 15 च्या सर्व व्हेरिएंटच्या किमती घसरल्या आहेत. ॲपलने प्रथमच भारतात सध्याच्या जनरेशनच्या प्रो मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. (हेही वाचा: Death Of 9-to-5 Jobs By 2034: इतिहासात जमा होतील 9 ते 5 नोकऱ्या, 2034 पर्यंत AI मुळे अनेक गोष्टी बदलतील; LinkedIn सह-संस्थापक Reid Hoffman यांची भविष्यवाणी)
आयफोनच्या किमतीत घट अशा वेळी आली आहे, जेव्हा चीनमध्ये आयफोन शिपमेंटमध्ये घट झाली आहे. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत चीनमधील आयफोनच्या शिपमेंटमध्ये 6.7 टक्के घट झाली आहे. आता ॲपलसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ बनली आहे. ॲपल भारतात आपला उत्पादन बेस सतत वाढवत आहे. भारतातील आयफोनचा मार्केट शेअरही सातत्याने वाढत आहे. देश जसजसा आर्थिक समृद्ध होत आहे, तसतसे अधिकाधिक लोक आयफोन खरेदी करत आहेत. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत ॲपलचा भारतातील बाजारातील हिस्सा दुहेरी अंकात होता.