जगभरात कोविड 19 च्या 8 लसींचे क्लिनिकल ट्रायल्स सुरु तर 110 लसी विकासाच्या विविध टप्प्यात- WHO ची दिलासादायक माहिती
Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असून मृतांचा आकडाही प्रचंड आहे. कोरोना विषाणूंवर ठोस औषधं किंवा लस उपलब्ध नसल्याने प्रादुर्भाव रोखणे काहीसे कठीण आहे. परंतु, कोविड 19 वरील लसीचे संशोधन जगभर सुरु आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) एक दिलासादायक माहिती दिली आहे. जगभरात कोरोना व्हायरसची लस दिलेल्या 8 स्वयंसेवकांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत. तर तब्बल 110 लसी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.

जगभरातील जवळपास सर्वच देशांमधील सरकार, आरोग्य संस्था आणि औषधं कंपन्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश कोविड 19 च्या लस संशोधनात अग्रेसर आहेत. दरम्यान चीन आणि अमेरिका या देशांनी कोविड 19 वरील लस पूर्णपणे तयार होण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे वर्तवला आहे. (कोरोना व्हायरस कदाचित कधीच नष्ट होणार नाही; कोविड 19 सह जगण्याची जगाला सवय करुन घ्यावी लागेल- WHO चा गंभीर इशारा)

ANI Tweet:

"कोरोना व्हायरसवरील लस लवकरात लवकर म्हणजे मार्च 2021 पर्यंत उपलब्ध करुन दिली जाईल," असे चायनीज आरोग्य अधिकारी Zhang Wenhong यांनी शनिवारी (16 मे) सांगितले. "लसीच्या विकासाबाबत काहीशी अनिश्चितता आहे. कारण MERS आणि SARS असलेल्या कोरोना व्हायरसवर प्रभावी अशी लस अद्याप मिळालेली नाही. प्रभावी आणि परिणामकारक लस बाजारात उपलब्ध व्हावी, हा यावरील उत्तम उपाय असेल. तरी देखील पुढच्या वर्षाच्या मार्च ते जून पर्यंत ही लस उपलब्ध होईल, असे Zhang यांनी ग्लोबल टाईम्सला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरस वरील लस मिळण्यात यश येईल," असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जगभरात तब्बल 46 लाख लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून 311,425 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसवरील लसीचे संशोधन कार्य अधिकाधिक गतीमान करण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्नशील आहेत.