Gambia Cough Syrup Deaths: हरियाणातील 4 कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा; सोनीपतमधील औषध कारखान्याला कुलूप, CDSCO कडून तपास सुरू
Cough Syrup (PC - Twitter)

Gambia Cough Syrup Deaths: भारतामध्ये बनवलेल्या चार कफ सिरपमुळे गॅम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यानंतर गुरुवारी हरियाणामध्ये खळबळ उडाली. दिल्ली, सोनीपत आणि चंदीगड येथील आरोग्य विभागाच्या पथकांनी सोनीपतमध्ये असलेल्या फार्मास्युटिकल फॅक्टरीवर छापा टाकला. हरियाणाचे ड्रग कंट्रोलर मनमोहन तनेजा यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी नमुने घेतले असून या नमुन्यांचा तपास सुरू आहे. सोनीपतस्थित वरिष्ठ औषध निरीक्षक राकेश दहिया यांनी सांगितले की, गेल्या एका आठवड्यात पाच नमुने गोळा केले असून ते कोलकाता येथील केंद्रीय औषधनिर्माण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. त्याचवेळी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, चारही सिरप केवळ निर्यातीसाठी तयार करण्यात आले होते. ते भारतात विकले गेले नाहीत.

विज म्हणाले, मेडेन फार्मास्युटिकल्सच्या कार्यालयातून चारही कफ सिरपचे पाच नमुने कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेत (CDL) पाठवण्यात आले आहेत. केंद्राच्या औषधनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य यांच्याशी सविस्तर संवाद साधला आहे. औषध कंपनीने तयार केलेले कफ सिरप केवळ निर्यातीसाठी मंजूर करण्यात आले होते. ते देशात विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Covid-19 vs Dengue: डेंग्यू आणि कोविड-19 ची अनेक लक्षणे आहेत सारखीच; मग काय आहे या दोन्हींमध्ये फरक? जाणून घ्या)

अहवाल आल्यानंतर केली जाणार कारवाई -

आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, सीडीएलचा अहवाल आल्यानंतरच आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू. काही गैर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, केंद्र या समस्येकडे लक्ष देत आहे. जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय समस्या असते तेव्हा भारत सरकार ते हाताळते. आत्तापर्यंत झालेले हे मृत्यू खरंच या औषधांमुळे झाले आहेत की, इतर कोणत्याही कारणामुळे हे अद्याप आम्हाला माहीत नाही.

हरियाणातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. कंपनी ही एक लहान आकाराची संस्था आहे आणि सर्व आवश्यक नमुने आणि कागदपत्रे संयुक्त तपासणी दरम्यान आणि मानक कार्यप्रणालीनुसार गोळा केली गेली आहेत. राज्याचे औषध नियंत्रक मनमोहन तनेजा यांनी सांगितले की, कंपनीत जे सिरप तयार केले जात होते ते तयार करणे बंद करण्यात आले आहे. नमुन्याचा अहवाल येईपर्यंत तयार सिरपही सील करण्यात आले आहे. त्याची पडताळणी केली जात आहे.

ऑल इंडिया केमिस्ट्स आणि डिस्ट्रीब्युटर्सना उद्धृत करण्यात आले आहे की, ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले औषध पुरवत नाही. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी फक्त तिच्या औषधांची निर्यात करते. परंतु जर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली तर त्यांचे पालन केले जाईल. दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की कंपनीने ही औषधे फक्त गांबियाला पाठवली आहेत. परंतु ती इतर ठिकाणीही पाठवली जाण्याची शक्यता आहे. कारण कंपनीने हीच दूषित द्रव्ये इतर औषधांमध्ये वापरली असल्याची शक्यता आहे.