IPL 2021, RCB vs MI: मुंबई इंडियन्सविरुद्ध Harshal Patel ची जबरदस्त हॅटट्रिक, सलग तीन चेंडूवर ‘या’ स्टार खेळाडूंना केले धराशायी (Watch Video)
हर्षल पटेल हॅटट्रिक (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) ने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 54 धावांनी पराभव केला. पहिले बॅटिंग करून आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफानी अर्धशतकच्या जोरावर 165/6 आव्हानात्मक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात मधल्या षटकांमध्ये गतविजेता मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढासळली आणि रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात करूनही संघ 111 धावांवर ढेर झाला. परिणामी संघाला 54 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले. रॉयल चॅलेंजर्सचा वेगवान गोलंदाज आणि पर्पल कॅप धारक हर्षल पटेल (Harshal Patel) संघाच्या विजयाचा नायक बनला. हर्षलने अंतिम क्षणी जबरदस्त गोलंदाजी कौशल्य दाखवून हॅटट्रिक घेतली आणि रेकॉर्ड-बुकमध्ये आपले नाव नोंदवले. हर्षलने ही हॅटट्रिक  (Harshal Patel Hattrick) तळाशी फलंदाजीला आलेल्या गोलंदाजांना बाद करून नव्हे तर दोन धडाकेबाज टी-20 खेळाडूंना बाद करून साजरी केली. (IPL 2021, RCB vs MI: हर्षल पटेलच्या हॅटट्रिकने युएईत मुंबईचा सलग तिसरा पराभव, रोहितच्या ‘पलटन’वर विराट‘आर्मी’ची 54 धावांनी मात)

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात डावाच्या 17 व्या षटकात हर्षल पटेलने हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि राहुल चहर यांना एकापाठोपाठ एक चेंडूंत बाद करून आपली हॅटट्रिक पूर्ण केली. हर्षल प्रवीण कुमार (2010) आणि सॅम्युअल बद्री (2017) नंतर आरसीबीसाठी हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला आहे. हर्षलने या सामन्यात एकूण 17 धावा खर्च करून 3.1 ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्या. त्याने MI विरुद्ध हंगामाच्या पहिल्या चकमकीत पाच विकेट्स घेतल्या. तसेच यासोबतच मुंबईविरुद्ध असा पराक्रम करणारा तो तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी बद्री आणि एकावेळी डेक्कन चार्जर्सकडून खेळत विद्यमान मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा यांनी हा कारनामा केला होता. हर्षलने पहिले हॅटट्रिक घेतली आणि नंतर अॅडम मिल्नेला त्याच्या शेवटच्या षटकात बाद करून चौथी विकेट मिळवली. यासह आरसीबीने या हंगामात आपला सहावा विजय नोंदवला आहे आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले आहे.

लक्षात घ्यायचे की हर्षल पटेलने आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध अप्रतिम खेळ दाखवला आहे. हंगामाच्या पहिल्या सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते. ज्यामध्ये तेव्हा हर्षलने पाच विकेट घेतल्या होत्या. त्या सामन्यात पटेलची हॅटट्रिक राहिली होती जी त्याने आज जेव्हा दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडले तेव्हा हे अपूर्ण काम पूर्ण केले. आयपीएल 2021 मध्ये या संघाविरुद्ध आरसीबी गोलंदाजाने केवळ 44 धावा देऊन आतापर्यंत नऊ विकेट्स घेतल्या आहेत.