Fake News (Photo Credits: File Image)

केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत सरकार देशातील गरीब, गरजू आणि विधवा महिलांना पैशांची मदत केली जाते.  अलीकडेच युट्युबवरील एका व्हिडिओमध्ये सरकार महिलांना 2 लाख रुपये देत असल्याचा दावा केला गेला आहे. व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री महिला सहाय्य योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्व महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन लाख रुपये टाकणार आहे. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. जर तुम्ही आता अर्ज केला नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.’

या व्हिडिओचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला एका महिलेचा फोटो आहे. वरती ठळक अक्षरात लिहिले आहे – ‘प्रधानमंत्री महिला सहायता योजना.’ खाली लिहिले आहे- महिलांच्या खात्यात थेट 2 लाख रुपये मिळतील. संपूर्ण भारतात. म्हणजेच ही योजना देशभरातील महिलांसाठी आहे.

पीआयबीने या व्हिडिओची सत्यता तपासली असता त्यातील सत्य समोर आले आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. अशाप्रकारे पीआयबीने हा संदेश पूर्णपणे फेटाळून लावला आहे. (हेही वाचा: PIB Fact Check: 21 मार्च पासून पुढील 7 दिवस संपूर्ण भारत बंद? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य)

सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. तसेच पीआयबीने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा संदेशांद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणाल, असेही पीआयबीने म्हटले आहे.