
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), रत्नागिरी (Ratnagiri), सातारा (Satara), सांगली (Sangli), अहमदनगर (Ahmednagar) अशा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावासाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. राज्यातील बळीराजा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र आनंद व्यक्त केला. हवामान खात्याने यावेळी वळीव बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज आगोदरच व्यक्त केला होता. कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन त्यात पाऊस बरसला. त्यामुळे या पावसाबाबत नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात वादळी वारा आणि वीजच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आज सायंकाळी पडला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे आणि कौले उडाले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून वीजवाहक तारांवर पडली. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडीत झाला. सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा शिडकाव पाहायला मिळाला.
सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. इथेही काही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले. मेघांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट यांमुळे प्राणी पक्षी भेदरले. लॉकडाऊन असल्याने कामगार न मिळाल्याने ज्या शेतकऱ्यांचा शेतमाल रानात होता त्याचे मात्र काहीसे नुकसान झाले. (हेही वाचा, Rain And Coronavirus: कोरोना व्हायरस आणि पाऊस; पुण्यात दोघांचाही बरसता सूर)
अहमदनगर जिल्ह्यातही पावासाने दमदार हजेरी लावली. दुपारी तीनच्या सुमारास इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस कोसळला. अकोले, पारनेर, जामखेड आदी तालुक्यात वादळी पाऊस पाहायला मिळाला. त्याचा इथल्या फळबागांना मोठा फटका बसला. नगर तालुक्यातील निंबळक, टाकळी खातगाव, एमआयडीसी परिसरातही चांगला पाऊस पडला. आज सकाळपासूनच अहमदनगर जिल्ह्यात पावसाची चिन्हे दिसत होती. दिवसभर उकाड्याने नागरिकांची घालमेल होत होती. भर दुपारी उन्हाचा कडाका फारच वाढला होता. इथले तापमान 37 ते 38 अंशावर पोहोचले होते. त्यामुळे आज पाऊस पडेल असा नागरिकांचा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला.
दरम्यान, हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस लवकर बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस सक्रिय झाल्याने 13 मेला राज्यात वळीव नक्षत्राचा पाऊस कोसळू शकेल असे हवामान खात्याने म्हटले होते. दरम्यान, यंदाचे वातावरण मॉन्सूनला पोषक आहे. त्यामुळे मॉन्सूनही वेळेवर दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.