
महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाचे आणि वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे-पवार पॅटर्न पहायला मिळू शकतो. आगामी काळात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena-NCP Alliance) हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढू शकतात. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीच युती उदयास येण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही नेत्यांमध्ये तशी चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे सत्तेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात केवळ सत्तेत एकत्र येऊन चालणार नाही. तर, आपण सोबत निवडणुकाही लढायला हव्यात असा विचार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या अत्यंत प्रमुख नेत्यांमध्ये सुरु आहे. एबीपी माझा या वृत्तवाहीनीने याबाबत वृत्त दिले आहे.
भविष्यात अशी नवी युती महाराष्ट्रात उदयास आलीच तर महाविकासआघाडीचे काय होणार. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेला आणि राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याबाबतही उत्सुकता आहे. आजघडीला तरी काँग्रेस हा पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तेमध्ये सहभागी आहे. (हेही वाचा, 'महाराष्ट्र भाजप आमदार महाविकासआघाडीच्या संपर्कात' यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट)
दरम्यान, काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी देशातील विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या आधारे सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या तूलनेत काँग्रेस अधिक काळ देशभरात केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेत राहिला आहे. काँग्रेसमधून फूटून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले आहेत. तर भाजपने अनेक प्रादेशिक पक्षांसोबत युती करुन सत्ता मिळवली आहे. तसेच, आपला विस्तारही केला आहे. उदा. महाराष्ट्र, पंजाब आणि इतर काही राज्ये. दरम्यान, भविष्यात प्रादेशिक पक्ष विरुद्ध राष्ट्रीय पक्ष असा संघर्षही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.