टीम इंडियाला सेमीफायनलपूर्वी मोठा धक्का! (Photo Credit - X)

Women's World Cup: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी आली आहे. टीम इंडियाची सध्या फॉर्ममध्ये असलेली सलामीची फलंदाज प्रतिका रावल दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. प्रतिकाची जागा भारतीय संघात स्फोटक फलंदाज शफाली वर्मा घेणार आहे. विश्वचषकासाठी सुरुवातीला निवडकर्त्यांनी शफालीकडे दुर्लक्ष करून प्रतिकाला प्राधान्य दिले होते. IND vs AUS T20 Series: वनडे मालिका संपली, आता टी-२० ची बारी! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचं वेळापत्रक, संघ अन् लाईव्ह जाणून एका क्लिकवर

शफालीचा संघात प्रवेश

क्रिकबझच्या वृत्तानुसार, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माचा भारतीय संघात समावेश केला जाईल आणि आयसीसीने या बदलाला मंजुरी दिली आहे. शफालीने ऑक्टोबर २०२४ पासून एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरीही तिने भारत 'अ' संघासाठी आणि विशेषत: ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध अत्यंत प्रभावी कामगिरी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळताना शफालीने बंगालविरुद्ध ११५ चेंडूंमध्ये १९७ धावांची शानदार खेळी केली होती. तिने २०२५ च्या महिला प्रीमियर लीगमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

प्रतिकाचे बाहेर पडणे मोठा धक्का

उपांत्य फेरीपूर्वी प्रतिका रावलचे स्पर्धेतून बाहेर होणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रतिकाने या स्पर्धेत आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. तिने सहा डावांमध्ये ५१ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या होत्या. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती फक्त स्मृती मानधनानंतर दुसऱ्या स्थानावर होती. न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या विजयी सामन्यात, प्रतिकाने १३४ चेंडूंचा सामना करत १२२ धावांची शानदार खेळी केली होती, ज्यात १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्याची जबाबदारी

आता ३० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल सामन्यासाठी शफाली वर्माचा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शफालीचा एकदिवसीय रेकॉर्ड फारसा प्रभावी नाही (पाच सामन्यांमध्ये १९ च्या सरासरीने ९९ धावा). त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करण्याची जबाबदारी तिच्यावर असेल.