दुखापतग्रस्त श्रेयस अय्यर आता धोक्याबाहेर (Photo Credit - X)

सिडणी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेताना जखमी झालेला भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्या प्रकृतीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुखापत झाल्यामुळे त्याला २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्राव (Internal Bleeding) झाल्यामुळे अय्यरची प्रकृती काहीशी बिघडली होती, त्यामुळे त्याला तातडीने आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. या बातमीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

श्रेयस अय्यर धोक्याबाहेर

आता क्रिकबझच्या अहवालानुसार, श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली आहे. त्याला आता आयसीयू मधून सोडण्यात आले आहे. याचा अर्थ अय्यर आता धोक्याबाहेर आहे आणि तो लवकरच बरा होईल. बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार, डॉक्टरांचे एक पथक अय्यरच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. तसेच, बीसीसीआय अय्यरच्या पालकांना शक्य तितक्या लवकर त्याच्या भेटीची व्यवस्था करत आहे.

अय्यर कधी मैदानात परतणार?

श्रेयस अय्यरची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असली, तरी त्याला रुग्णालयातून अजून डिस्चार्ज मिळालेला नाही. तो आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच राहणार आहे. नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबरच्या सुरुवातीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत अय्यर खेळण्याची शक्यता कमी आहे. तोपर्यंत तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, जानेवारीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर मैदानात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.