भाजपची घसरगुंडी, आता केवळ 30 ते 35% प्रदेशातच सत्ता: शिवसेना
Shiv Sena,Narendra Modi | (Photo credit: Archived, edited, symbolic image )

2018 मध्ये भाजप (BJP) साधारण 75% प्रदेशांत सत्ता ठेऊन होती आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम 30-35% प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे. भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, अशा शब्दांत झारखंड विधानसभा निवडणुकीत (Jharkhand Assembly Election 2019) झालेल्या पराभवावरुन शिवसेनेने (Shiv Sena) भाजपवर टीका केली आहे. 2018 ला देशातील 22 राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर, तेथील जनाता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या 'झारखंडही गमावले' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ही टीका करण्यात आली आहे.झारखंडमधूनही भारतीय जनता पक्षाचे राज्य गेले आहे. आधी महाराष्ट्र गेले, आता झारखंड गेले. महाराष्ट्र व झारखंड या राज्यांची तुलना करता येणार नाही. मात्र भाजपने आणखी एक राज्य गमावले व पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आले नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होतील. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांची आघाडी बहुमताचा आकडा गाठणार हे स्पष्ट आहे. या आघाडीत सर्वाधिक जागा झारखंड मुक्ती मोर्चाला मिळाल्या आहेत. काँग्रेसनेही दोन आकडी टप्पा गाठला आहे, तर राजदलाही पाच-सात जागा मिळाल्या आहेत. थोडक्यात, काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानची घोषणा भाजपचे नेते करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली. मध्य प्रदेश, राजस्थान ही मोठी राज्ये भाजपने आधीच गमावली, असे सामनात म्हटले आहे.

एक महिन्यापूर्वी हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेथेही काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपची सत्ता तेथूनही जवळ जवळ गेलीच होती, पण ज्या दुष्यंत सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच दुष्यंत यांचा टेकू घेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपने कशीबशी सत्ता राखली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विराजमान झाले. २०१८ साली भाजप साधारण ७५ टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे व जेमतेम ३०-३५ टक्के प्रदेशांत भाजपची सत्ता दिसत आहे.

या लेखा पुढे म्हटले आहे की, भाजपची घोडदौड अनेक राज्यांत लंगडी पडली हे चित्र विचार करायला लावणारे आहे. २०१८ ला देशातील २२ राज्यांत भाजपची सत्ता होती. ईशान्येकडील राज्यांतही भाजप घुसली. अगदी त्रिपुरा, मिझोरामपर्यंत त्यांचे झेंडे फडकले, पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात सगळय़ात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. हे संपूर्ण देशातच घडताना दिसत आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण)

झारखंडमध्ये मोदी व शहा यांनी सभा घेतल्या. मोदी यांच्याच नावावर मते मागितली. गृहमंत्री अमित शहा यांची झारखंडच्या प्रचार सभेतील भाषणे तपासली तर तेथे सरळ हिंदू-मुसलमान असा भेद करायचा प्रयत्न होता हे स्पष्टपणे दिसते. लोकांनी एकदा ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात, असा टोलाही सामनातून भाजपला लगावण्यात आला आहे.