महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 258 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 258 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 16,401 वर पोहचला आहे. त्यापैकी 2789 अॅक्टिव्ह रुग्ण असून 13,446 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच एकूण 166 कर्मचाऱ्यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन ते आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणी पोलीस दलातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. तसेच 55 व्या वर्षापेक्षा अधिक वय असलेले पोलीस दलातील कर्मचारी कोविड19 च्या काळात काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सुद्धा आपले काम चोख बजावताना दिसून येत आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध उपाय योजना सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.(महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ठरवलेल्या रक्कमेपेक्षा बिलाचे अधिक पैसे उकळल्यास सदर व्यक्तीला 5 पट दंड किंवा शिक्षा केली जाणार- राजेश टोपे)

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनलॉकिंग-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ई-पासची आवश्यकता नसणार असून नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात काल कोरोनाचे आणखी 19,218 रुग्ण आढळून आले असून 387 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनासंक्रमितांचा आकडा 8,63,062 वर पोहचला आहे.