महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ठरवलेल्या रक्कमेपेक्षा बिलाचे अधिक पैसे उकळल्यास सदर व्यक्तीला 5 पट दंड किंवा शिक्षा केली जाणार- राजेश टोपे
राजेश टोपे (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तसेच कोरोनासंक्रमितांची गैरसोय होऊ नये म्हणून सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची बिलाच्या रक्कमेतून लूट केली जात असल्याच्या खुप तक्रारी समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयांच्या बिलांचे पूर्व ऑडिट केले पाहिजे आणि त्या संदर्भातील विशेष सुचना सुद्धा रुग्णालयांना दिल्या आहेत. रुग्णाला बिल हातात देण्यापूर्वी त्याचे ऑडिटरने ऑडिट करावे. ऐवढेच नाही तर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्या मागील कारणे सुद्धा शोधावीत असे ही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत जर एखाद्याने ठरवलेल्या रक्कमेहून अधिक पैसे उकळल्यास त्याला बिलाची 5 पट रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा होऊ शकते असा इशारा सुद्धा राजेश टोपे यांनी दिला आहे.(पुणे: कोरोना संकट नियंंत्रणात आणण्यासाठी अजित पवार यांंनी प्रकाश जावडेकर यांंच्यामार्फत केंद्राकडे केल्या 'या' मागण्या)

दरम्यान,  राज्यात काल कोरोनाचे आणखी 19,218 रुग्ण आढळून आले असून 387 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनासंक्रमितांचा आकडा 8,63,062 वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 6,25,773 जणांची प्रकृती सुधारली असून 2,10,978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचसोबत आतापर्यंत 25,964 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपली जीव गमावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या महासंकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.