Aaditya Thackeray Nistha Yatra: शिवसेना पुनर्बांधनीस वेग, आदित्य ठाकरे काढणार 'निष्ठा यात्रा'; बंडखोरांच्या मतदारसंघात लावणार ताकद
Aditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 बंडखोर आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मोठ्या हिमतीने मैदानात उतरले आहेत. पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड झाल्यानंतर सोबत उरलेल्या मोजक्या नेत्यांसोबत आणि असंख्य शिवसैनिकांसोबत या पितापुत्रांनी शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढणार आहेत. या यात्रेस उद्या म्हणजेच 8 जूनपासून प्रारंभ होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी आपण अद्यापही शिसेनेतच आहोत. आपण उद्धव ठाकरे यांनाच नेता मानतो अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. परिणामी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेस उद्यापासून प्रारंभ करणार आहेत. यात्रेदरम्यान, आदित्य ठाकरे हे शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातही शिवसेना शाखांना भेट देणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देणे हाच या यात्रेपाठीमागे हेतू असणार आहे. (हेही वाचा, Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या ट्विटमुळे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची गोची, उद्धव ठाकरे यांना 'माफिया' संबोधले)

आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा कार्यक्रम

  • 8 जूनपासून यात्रेस सुरुवात
  • शिवसेनेच्या तब्बल 236 शाखांना प्रत्यक्ष भेट
  • शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातहीकरणार यात्रा
  • शाखेतील गटप्रमुख, शाखाप्रमुख,शिवसैनिक यांच्याशी थेट भेट
  • निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांबद्दल आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते. आजही ते तितकेच आक्रमक आहेत. बंडखोर आमदारांमुळे महाविकासआघाडीचे सरकार गेले. धक्कादायक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री असताना शिवसेनेची सत्ता गेली. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणावर दु:ख झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच शिवसैनिकांना बळ देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांविरुद्ध आक्रमकपणा कायम ठेवला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'गद्दार हे गद्दारच असतात. पण जे सोडून गेले आहेत आणि त्यांना परत यायचे असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत.'