Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या ट्विटमुळे एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची गोची, उद्धव ठाकरे यांना 'माफिया' संबोधले
Kirit Somaiya | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचा एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजप यांचे संयुक्त सरकार नुकतेच सत्तेत आले आहे. सत्तेतील आमदारांची दिलजमाई होण्यास आता कुठे सुरुवात झाली आहे. तोवरच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार असे दोन्ही बाजूचे आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. खास करुन सोमय्या यांच्या ट्विटमुळे शिंदे गटातील आमदारांची चांगलीच गोची झाली आहे. आपल्या ट्विटमध्ये किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा 'माफिया' असा उल्लेख केला आहे. सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा रोख कोणाकडे आहे हे स्पष्ट होते.

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले'. किरीट सोमय्या यांनी आपले ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्र भाजपच्या हँडललाही टॅग केले आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे गट आणि भाजपामध्ये सत्तावाटपाचे सूत्र निश्चित? कोणाकडे किती मंत्रिपदे? घ्या जाणून)

शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी, स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील जवळपास सर्वच आमदार हे आपण शिवसेनेतच असल्याचे सांगत आहेत. तसेच, आपण आजही उद्धव ठाकरे यांनाच मानत असल्याचेही ते सांगतात. अपवाद वगळता शिंदे गटातील एकाही आमदाराने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीकात्मक वक्तव्य केले नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या ट्विटवर शिंदे गटातील आमदार काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता आहे.

ट्विट

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटले आहे की, आजही आम्ही शिवसेनेत आहोत. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणत्याही भाजप नेत्यांनी चुकीचे अथवा प्रतिमा मलीन करणारे वक्तव्य करु नये. किरीट सोमय्या हे भाजपचे नेते आहेत. प्रत्येक नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देणे योग्य नाही. परंतू, सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षांमध्ये भावना दुखावतील अशी विधाने दोन्ही बाजूच्या नेत्यांनी करु नयेअसे ठरले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांशी समन्वय साधून मार्ग काढतील, असे दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.