Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे गट आणि भाजपामध्ये सत्तावाटपाचे सूत्र निश्चित? कोणाकडे किती मंत्रिपदे? घ्या जाणून
CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांचे नेतृत्व करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच पार पडत आहे. सरकारमधील दोन्ही घटकांमध्ये सत्तेचे सूत्र निश्चित झाले असून त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तारही पार पडणार अशी चर्चा आहे. राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये 38 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यापैकी शिंदे गटाला 13 तर भाजपच्या वाट्याला 38 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात 38 मंत्र्यांचा सामावेश असेल. आमदारांची संख्या अधिक असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला झुकते माप दिले जाईल. चार आमदारांमागे प्रत्येकी एक मंत्री असे सूत्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार भाजपच्या वाट्याला 38 तर शिंदे गटाच्या वाट्याला 13 मंत्रिपदे येऊ शकतील. आगामी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रामुख्याने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिपदाचे वाटप केले जाईल, अशी चर्चा आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion Soon: नव्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार- देवेंद्र फडणवीस)

भाजप आणि शिंदे गटातील नेमक्या कोणत्या आमदारांची वर्णी मंत्रिपदासाठी लागेल हे अद्याप तरी स्पष्ट झाले आही. माजी मंत्र्यांनाच नव्याने संधी दिली जाते की, नव्या चेहऱ्यांचा शोध घेतला जातो याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही बाजूंनी मात्र मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. यात माजी कॅबिनेट मंत्र्यांना मनासारखे खाते हवे आहे. तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेट पदावर बडती आहे. आमदारकीची हॅटट्रीक केलेल्या आमदारांमध्ये कोणतेही खाते मिळूदे पण मंत्रिपद द्या, अशी भवना आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरुन प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. उत्सुकता कितीही निर्माण झाली तरी मंत्रिमंडळ विस्तार अधिकृतरित्या जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कोणत्याही चर्चा, शक्यतांना काहीच आधार राहणार नाही हे निश्चित.