शिवसेना (Shiv Sena) पक्षात बंड केल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार गेले. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) हे देखील त्यांपैकीच एक. याच कीर्तिकरांना महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी पक्षाचे तिकीट मिळालेल्या रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा प्रचार करावा लागला. त्यांचा सामना अमोल कीर्तिकर यांच्यासोबत झाला. जे शिवसेना (UBT) पक्षाचे उमेदवार आहेत. दरम्यान, मतदानाचा निकाल (4 मे) अद्याप लागायचा आहे. ऐन निवडणूक आणि मतदानादरम्यान घेतलेल्या भूमिकेमुळे गजानन कीर्तिकर चर्चेत आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिंस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कीर्तिकर पितापुत्रांचा एकाच कार्यालयातून प्रचार
शिवसेना पक्षातील अनेकांनी दावा केला आहे की, गजानन कीर्तिकर हे रविंद्र वायकर यांचा प्रचार करण्याऐवजी चक्क अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करत होते. तसेच, कीर्तिकर पितापूत्र हे एकाच कार्यालयात बसून आपापला प्रचार करत होते. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांचा शिवसेना पक्षाच्या उमेदवारापेक्षा विरोधी पक्षाच्या उमेदवारालाच अधिक फायदा झाला, असा आरोप शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी केला. (हेही वाचा, Loksabha Election 2024: महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र, भाजप नेत्याचा गजानन कीर्तिकरांवर निशाणा)
शिशिर शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांच्या कृतीची दखल घ्यावी आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन पक्षातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. अमोल कीर्तिकर यांच्यासोबत एकाच पक्ष कार्यालयातून काम केल्यामुळे त्याचा पक्षाच्या उमेदवारापेक्षा अधिक फायदा हा थेट विरोधी पक्षालाच अधिक झाला आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पक्षाने गांभीर्याने दखल घ्यावी, असेही या पक्षात्र म्हटले आहे.
गजानन कीर्तिकर यांच्याकडून स्पष्टीकरण
दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, पाठीमागील अनेक वर्षांपासून अमोल कीर्तिकर हे माझ्या निधीवाटपाचे नियोजन करत असतात. त्यामुळे ते कार्यालयात बसत असत. असे असले तरी, मी वेगळी भूमिका घेतल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी माझ्यासोबत माझ्या कार्यालयात बसणे बंद केले. आता आपण आपली भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीमध्ये परत जाणार नाही, असेही ते म्हणाले.
वडीलांच्या कामाचा फायदाच होईल
गजानन कीर्तिकर 10 वर्षे खासदार होते. या काळात 10 पैकी 9 वर्षे आपण त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आपल्यालाही नागरिकांच्या प्रश्नाची माहिती आणि जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा आपल्याला फायदाच होईल, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिशिर शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी एका पक्षात राहून दाखवावे. राजकीय वाटचालीत त्यांनी असंख्य पक्ष बदलल्याचेही ते म्हणाले.