Strong Bones : पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे कोणत्याही वयात हाडं (bones) कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम(calcium) आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये तर हाडांचे दुखणे हे पुरूषांच्या तुलनेत आधी सुरू होते. किंबहूना तिशी ओलांडताच किंवा त्या आधीही काही महिलांना हाडांचा त्रास जाणवतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं तर कमकुवत होतातच पण त्यासोबतच नखं आणि दातही खराब होऊ लागतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, स्नायूंमध्ये क्रॅम्प येणे, थकवा यासारख्या समस्या उद्भवतात.
आपल्या शरीराची हालचाल सुरळीत रहावी असे प्रत्येकाला वाटते. पण आहार नीट नसेल तर हाडे मजबूत राहाणार नाहीत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, स्नायू आणि हाडं दुखणे, हाडं कमकुवत होणे आणि तुटणे, हाडं वाकडी होणे यासारख्या समस्या लहान वयातच उद्भवू शकतात. त्यामुळे काही पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
दुग्धजन्य पदार्थ : जेव्हा कॅल्शियमचा विषय निघतो, तेव्हा डोक्यात सगळ्यात पहिले दूधाचा विचार येतो. हाडं मजबूत होण्यासाठी किंवा पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात एक ग्लास दूध पिणे आवश्यक आहे. याशिवाय दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.
सोयाबिन, शेंगदाणे : सोयाबिनमध्ये कॅल्शियमसह प्रोटीन देखील आढळते. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड, पिस्ता आणि चिया बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. आपण स्नॅक्स म्हणून या दोन्ही गोष्टी खाऊ शकता.
डाळी : विविध प्रकारच्या डाळींमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय तीळ आणि गूळ यांचे मिश्रण खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात. आपण आपल्या आहारात नियमित डाळींचा समावेश करू शकता.
अंडी : अंडी ही पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानली जातात. याच्या पांढऱ्या भागात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच त्यात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर असते. त्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करा.
बदाम : कॅल्शिअमने समृद्ध असलेले बदाम केवळ तुमची हाडं मजबूत करत नाहीत तर ते हृदय आणि मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात चांगले फॅट्स असतात. रोज सकाळी भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर मानले जाते.
पालेभाज्या : लोह असो वा कॅल्शिअम, पालेभाज्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. भाज्या अनेक पोषक तत्वांचा खजिना असतात. तुमच्या आहारात पालकाचा समावेश केल्यास अशक्तपणा दूर होतो आणि कमकुवत हाडांपासूनही बचाव होतो. त्यामुळे लहान मुलांनी तसेच मोठ्यांनीही आहारात पालकाचा समावेश करावा.
मशरूम: व्हिटॅमिन डी ने समृध्द असलेले मशरूम हा शाकाहारी लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यात प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन बी, सी देखील मुबलक प्रमाणात आढळतात.