आई होणं म्हणजे काही सोपे नाही. जेव्हा आपल्या गर्भातील तो कोवळा जीव, ते तान्हुल निरागस बाळ जेव्हा या जगात येत आणि त्याला त्याची आई जेव्हा छातीशी कवटाळून घेते तो अनुभव जगातील अदभूत अनुभव आहे. बाळ जगात आल्यावर जी पहिली गोष्ट तो आपल्या तोंडात घेतो ती म्हणजे आईचे स्तनपान. त्यामुळे जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मातांसाठी स्तनपान कसे करावे ह्याबाबत आम्ही काही विशेष माहिती सांगणार आहोत. यंदा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा 'जागतिक स्तनपान सप्ताह' (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येत आहे. स्तनपान हा बाळाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अनेक मातांना आपल्या बाळांना आपले दूध नीट पुरतं की नाही ही समस्या सतत भेडसावत असते. त्यामुळे ब-याचदा स्तनपान करताना अनेक माता स्तनपान कसे करावे याकडे जास्त लक्ष देत नाही.
मात्र आजकाल ब-याच रुग्णालयात बाळ (Baby) झाल्यानंतर आईने बाळाला कसे दूध पाजावे याबाबत मार्गदर्शन केले जाते. आपले दूध आपल्या बाळापर्यंत नीट पोहचण्यासाठी स्तनपान करताना बसण्याची पद्धतच जास्त महत्त्वाची असते. त्यासाठी आपण पुढे दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.
1. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्तनपानासाठी मातेस स्वतंत्र अशी खोली असावी. तसे नसल्यास ती जेथे स्तनपान करणार आहे तेथे स्वच्छता, शांतता आणि प्रसन्न असे वातावरण असावे.
2. मातेने स्तनपान करताना नेहमी मांडी घालून बसावे. पण अनेकदा प्रसूती दरम्यान पडलेल्या टाक्यांमुळे तसे करणे मातेला शक्य नसते. अशा वेळी खुर्ची किंवा सोफ्यावर बसून मातेला स्तनपान करता येते. शक्यतो झोपून स्तनपान करणे टाळा.
3. अंगावर स्तनपान करण्याआधी मातेने आपले दोन्ही हात स्वच्छ धुऊन घ्यावे. आणि ओल्या फडक्याने आपले स्तन स्वच्छ पुसून घ्यावे. असे म्हणतात मातेच्या स्तनांमध्ये दूध आणि पाणी हे दोन्ही पोषकतत्वे असतात. त्यामुळे स्तनांमधून सुरुवातीला येणा-या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेत आणि त्यानंतर येणा-या दूधातून अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दोन्ही बाजूने कमीत कमी 15-20 मिनिटे दूध पाजावे. बाळाला दूध पाजताना एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर दुस-या बाजूने दूध पाजावे. एक बाजू अर्धवट पाजली गेली असेल तर पुढील वेळेस ती अर्धवट बाजूने बाळास स्तनपान करणे.
4. ज्या बाजूने बाळाला स्तनपान करणार असाल त्या बाजूला मांडीवर उशी ठेवावी आणि ती मांडी थोडी वर करुन बसावे. त्यानंतर बाळाच्या मानेखाली आपल्या त्या बाजूच्या हाताने आधार देऊन आपल्या दुस-या हाताच्या दोन बोटांनी स्तन पकडून बाळाच्या तोंडात द्यावे.
हेही वाचा- स्तनपान करणा-या महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 10 पदार्थ, बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो विपरित परिणाम
5. लक्षात ठेवा स्तनपान करताना आपल्या हाताच्या बोटांनी स्तन पकडणे गरजेचे आहे. कारण मातेची छाती ही दुधाने भरलेली असते. त्यामुळे ती पेलणं नवजात बालकासाठी घातक ठरू शकते. अशा वेळी त्यांचा श्वास गुदरमरू शकतो किंवा अनेकदा त्यांचे नाक थोडं बसकं होऊ शकते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्तनपान करताना मातेने नेहमी प्रसन्न, शांत आणि एकाग्र असावे. घाई गडबड करणे, बडबड करणे, स्तनपान करताना इतर काही कामे करणे या गोष्टींचा परिणाम दुधावर होतो. त्यामुळे कदाचित तुमच्या बाळाचे पोट पुर्णपणे भरणार नाही. आपले मूल निरोगी आणि आनंदी राहावे असे प्रत्येक मातेला वाटते. त्यामुळे स्तनपान करताना ह्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतल्यास तुमचे बाळही हसरं-खेळत राहील.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)