Breast Feeding (Photo Credits: PixaBay)

प्रत्येक महिलेसाठी आई होणं हा जितका अद्भूत अनुभव आहे, त्या पेक्षा जास्त मातृत्व स्विकारणे ही मोठी जबाबदारी आहे. याची मुख्य सुरुवात होते ती स्तनपानापासून (Breast Feeding) बाळाला आईचं दूध हा सर्वात पोषक आहार असतो. जन्मलेलं बाळं हे सुरुवातीचे काही महिने तरी आईच्या दूधावर अवलंबून असते. बाळाला निरोगी ठेवण्यासाठी किमान पहिले 6 महिने बाळाचा आईचे दूध मिळणे गरजेचे असते. त्यामुळे स्तनपानातून आई जे अन्नपदार्थ खाते त्याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होतो.

म्हणून स्तनपान करणा-या महिलांनी काही गोष्टी कटाक्षाने टाळण्याची आवश्यकता आहे. तसे न केल्यास तुमच्या बाळाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांनी पुढील अन्नपदार्थ खाणे पुर्णत: टाळावे.

1. जंक फूड खाण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढत चालले आहे. म्हणून स्तनपान करणा-या महिलांनी चिप्स, शीतपेय, पिझ्झा, बर्गर या गोष्टी पुर्णपणे वर्ज्य करा. तसे न केल्यास बाळांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो. आणि त्यांना जुलाबही होतात.

2. उडदाची डाळ आणि उडदापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे पोटात गॅस बनू शकतो. तसेच बाळाच्या पोटदुखीसाठीही कारणीभूत ठरू शकते.

3. शिळे तसेच बराच काळ ठेवलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासोबतच तुमच्या दुधातील पोषकतत्वेही कमी होतात.

4. धूम्रपान, मद्यपान करणे टाळा. कारण त्याचा विपरित परिणाम स्तनपान करणा-या बाळाच्या शरीरावर होऊ शकतो.

5. खूप मसालेदार तसेच तिखट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे बाळाच्या गळ्याला जळजळही निर्माण होऊ शकते. तसेच अॅसिडिटीचाही धोका संभवतो.

6. वांगी, शेंगदाणे यांसारखी पित्तवर्धक गोष्टी खाऊ नये. यामुळे बाळाला पोटदुखी त्रास होऊन त्याची चिडचिड होऊ शकते.

7. ज्या गोष्टी पचण्यास जड आहेत उदा. चिकन, बांगडा, हलवा यांसारखे गरम पदार्थ टाळावे. याचा परिणाम बाळाच्या शरीरावर होऊन त्यांना पोटदुखी किंवा त्वचेची एलर्जी होऊ शकते.

8. कच्चे चणे, कच्चे सॅलड अधिक प्रमाणात खाऊ नये. ह्यामुळे स्तनपान करणा-या बाळाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

9. कच्च्या भाज्या खाऊ नये. बाळाला पोटदुखी तथा गंभीर आजार होऊ शकतो.

10. अति गोड पदार्थ अथवा तेलात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आईचे जास्त गोड खाणे भविष्यात बाळाला मधुमेहाचा त्रास उद्भवू शकतो.

हेही वाचा- Chandra Grahan 2019: ग्रहणकाळात गर्भवती स्त्रियांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आईचे दूध हा बाळासाठी सर्वात पौष्टिक आहार असल्यामुळे आईने पौष्टिक अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे. तसे केल्यास तुम्ही निर्धास्तपणे बाळाला स्तनपान करु शकता. शिवाय तुमचेही बाळही निरोगी आणि छान गुटगुटीत होईल. नाही का?

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)