Covishield, Covaxin आणि Sputnik V या कोविड-19 लसींमधील नेमका फरक काय? जाणून घ्या लसींची किंमत, डोसेसमधील अंतर आणि परिणाम
Covishield, COVAXIN And Sputnik V (Photo Credits: PTI & ANI)

भारतातील सर्व नागरिकांचे कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) 2021 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या देशामध्ये दोन प्रमुख कोविड-19 लसी(Covid-19 Vaccines) लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत. यापैकी एक कोविशिल्ड (Covishield) तर दुसरी कोवॅक्सिन (Covaxin) आहे. मागील महिन्यात स्पुटनिक व्ही (Sputnik V) ला देखील आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली होती. ही रशियन लस जून महिन्यापासून खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

जुलैच्या अखेरपर्यंत 20-25 कोटी कोविड-19 लसी तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 30 कोटी कोविड-19 लसी उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस आहे. रिपोर्टनुसार, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने लसीची उत्पादन प्रक्रीया वाढवली असून या महिन्याच्या अखेरपर्यंत 10 कोटी डोसेस तर जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत 10 ते 12 कोटी डोसेस केंद्र सरकारला देणार आहेत. दरम्यान, कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसींची किंमत, डोसेस मधील अंतर आणि परिणाम यांची माहिती घेऊया...

लसींच्या दोन डोसेसमधील अंतर:

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील अंतर कमीत कमी 4 आठवड्यांचे म्हणजेच 28 दिवसांचे असावे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस मधील अंतर सुरुवातीला 4-6 आठवडे सांगण्यात आले होते. परंतु, आता नवीन माहितीनुसार, या दोन डोसमधील अंतर किमान 3 महिने असावे, असे म्हटले आहे. तर स्पुटनिक व्ही लसीच्या दोन डोसमधील अंतर 21 दिवसांचे असावे.

किंमत:

45 वर्षावरील वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. खाजगी रुग्णालयांना या लसीच्या डोसची किंमत 250 रुपये ठरवण्यात आली आहे. परंतु, 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीची किंमत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड लस सरकारी रुग्णालयात 300 रुपयांना तर खाजगी रुग्णालयात 600 रुपयांना उपलब्ध आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस सरकारी रुग्णालयात 400 रुपयांना तर खाजगी रुग्णालयात 1200 रुपयांना उपलब्ध आहे. स्पुटनिक व्ही लवकरच सर्व अपोलो हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याची किंमत 1125 रुपये इतकी असेल.

 लसींचा प्रभाव आणि परिणाम:

कोवॅक्सिन लस ही 78 टक्के परिणामकारक असून symptomatic Covid-19 रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या डोसनंतर कोविशिल्ड लस 76 टक्के परिणामकारक दिसून आली आहे. स्पुटनिक व्ही लस 95 टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे.

कोविशिल्ड ही लस अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एकत्रितपणे निर्मित केली असून पुण्यातील सिरम इंस्टीट्यूट भारतात त्याचे उत्पादन करत आहे. कोवॅक्सिन ही स्वदेसी लस असून भारत बायोटेकने विकसित केली आहे. तर स्पुटनिक व्ही लस रशियाच्या गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी ने निर्मित केली आहे. हैद्राबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबमध्ये या लसीचे उत्पादन सुरु असून सीरम इंस्टीट्यूटला देखील उत्पादनासाठी परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, या तिन्ही लसींसोबतच बायोलॉजिकल-ई कंपनीची Corbevax देखील लवकरच लसीकरणात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने बायोलॉजिकल-ई सोबत करार केला असून 1500 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंटही करण्यात आले आहे. करारानुसार, बायोलॉजिकल-ई कडून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान या लसीचे 30 कोटी डोसेस तयार करण्यात येणार आहेत.