Serum Institute जूनमध्ये Covishield चे 10 कोटी  डोसेस पुरवणार; देशातील कोविड-19 लसीकरणाला वेग येण्याची शक्यता
Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत आली असली तरी अद्याप संकट टळलेले नाही. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सगळ्याला सामोरे जाण्यासाठी लसीकरण (Vaccination) वेगाने होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जून अखेरपर्यंत 20-25 कोटी लसींचे डोसेस तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये 30 कोटी लसींचे डोसेस खरेदी करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा पाहायला मिळत असताना ही महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने लसींच्या निर्मितीला वेग दिला असून जूनअखेरपर्यंत केंद्र सरकारला 10 कोटी कोविशिल्डचे डोसेस आणि जुलै अखेरपर्यंत 10-12 कोटी लसींचे डोसेस पुरवणार आहे. लसींची पुरेशा प्रमाणात खरेदी केल्यानंतर दिवसाला 1 कोटी नागरिकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. (खाजगी रुग्णालयं आणि हॉटेल्सकडून दिली जाणारी Vaccination Package तातडीने बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कालच्या अपडेटनुसार, एकूण 21,20,66,614 लसींचे डोसेस 30,07,831 सत्रात देण्यात आले आहेत. मे महिन्यासाठी केंद्र सरकारतर्फे राज्यांना 4.03 कोटींहून अधिक लसींचे डोसेस मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एकूण 3.90 कोटी डोसेस 2021 च्या मे महिन्यात राज्य आणि खाजगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळेच मे 2021 मध्ये राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी एकूण 7,94,05,200 डोस उपलब्ध झाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांंनी भारतातील लसीकरण डिसेंबर 2021 च्या आधी पूर्ण होईल, असे म्हटले होते. त्यातच वरील माहिती समोर आल्यामुळे लसीकरण वेगाने होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

भारतात सध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन, सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड लस लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला देखील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे.