COVID-19 Vaccination in India: खाजगी रुग्णालयं आणि हॉटेल्सकडून दिली जाणारी Vaccination Package तातडीने बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश
COVID-19 Hospital | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोविड-19 लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) काही खाजगी रुग्णालयांनी (Private Hospitals) हॉटेल्स (Hotels) सोबत मिळून व्हॅसिनेशन पॅकेजेस (Vaccination Packages) सादर केले आहेत. ते तातडीने थांबवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात खाजगी रुग्णालयं आणि स्टार हॉटेल्सकडून दिली जाणारी व्हॅसिनेशन पॅकेजेस तात्काळ बंद करण्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हॅकसिनेशन पॅकेजची जाहीरात करणाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळाल्यानंतर केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हे आदेश देण्यात आले आहे. (COVID-19 Vaccination in India: भारतातील कोविड-19 लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल- प्रकाश जावडेकर)

काही खाजगी रुग्णालयं हॉटेल्सोसोबत मिळून व्हॅसिनेशन पॅकेज सादर करत असल्याचे निर्दशनास आले आहे. हे राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेच्या गाईडलाईन्सच्या विरुद्ध असल्याने तात्काळ थांबवावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. मनोहर अग्निनी यांनी पत्रात नमूद केले आहे. असे लसीकरण पॅकेजेस देणाऱ्या रुग्णालयं आणि हॉटेल्स विरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

कोविड लसीकरण मोहिमेच्या मार्गदर्शन सूचनांनुसार, लसीकरण मोहिमेसाठी चार पर्याय देण्यात आले आहेत- सरकारी कोविड लसीकरण केंद्र, खाजगी कोविड लसीकरण केंद्र, केंद्राकडून चालवण्यात येणारी खाजगी हॉस्पिटल्स, सरकारी कार्यालयात असणारी वर्कप्लेस कोविड लसीकरण सेंटर्स, ज्येष्ठ आणि दिव्यागांसाठी घराजवळ असणारी लसीकरण केंद्र, याव्यतिरिक्त कुठेही आणि कोणीही लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण करु शकत नाही. त्यामुळे दिलेल्या गाईडलाईन्सनुसारच लसीकरण होतं की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.