Union Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

कोविड-19 लसीकरणावरुन (COVID-19 Vaccination) केंद्र सरकारवर सातत्याने होणाऱ्या टीकेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी उत्तर दिले आहे. भारतातील कोविड-19 लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही वेळापूर्वीच केलेल्या टीकेलाही त्यांनी यावेळी उत्तर दिले.

जावडेकर म्हणाले की, भारतातील लसीकरण 2021 पूर्वी पूर्ण होईल. 1.08 बिलियन नागरिकांचे लसीकरण, 2.16 बिलियन डोसेसची निर्मिती याची ब्लूप्रिंट  आरोग्य मंत्रालयाकडे तयार आहे. राहुलजी, तुम्हाला जर लसीकरणाची चिंता आहे. तर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांकडे लक्ष द्या. तिथे सर्व गोंधळ आहे. 1 मे पासून सुरु झालेल्या 18-44 वर्षांच्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत नाही आहे.

ANI Tweet:

दरम्यान, सध्याच्या व्हॅसिन डिलिव्हरी रेटनुसार, भारतातील 300 मिलियन नागरिकांना लस देण्यासाठी फेब्रुवारी 2022 उजाडेल. ही संख्या भारताच्या लोकसंख्येच्या 20 टक्के इतकी आहे, असे विविध मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत संथ गतीने चालणाऱ्या लसीकरणाबाबत प्रश्न उभे केले होते. या गतीने लसीकरण केल्यास संपूर्ण भारतीय जनतेला लस मिळेपर्यंत 2024 उजाडेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचेही ते म्हणाले होते. (Coronavirus: कोरोना व्हायरस संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळलेच नाही- राहुल गांधी)

लस निर्मात्यांकडे लसीची मागणी करण्यास भारताने विलंब लावल्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. बहुतांश देशांनी 2020 च्या मध्यामध्ये लसींची मागणी सुरु केली होती. तर भारताने आपली पहिली ऑर्डर जानेवारी 2021 मध्ये पाठवली. दरम्यान, सध्या देशात कोवॅक्सिन, कोविशिल्ड लसी दिल्या जात आहेत. जून महिन्यापासून स्पुटनिक व्ही ची लस निर्मिती देशात सुरु होईल.