Haffkine Biopharma | Photo Credits: PIB MUMBAI

लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग सातत्याने वाढविण्यात येत आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आत्मनिर्भर भारत 3.0 कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने तीन सरकारी उद्योगांना पाठबळ पुरविले आहे. हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मर्या., मुंबई, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स मर्या., हैदराबाद आणि भारत इम्युनॉलॉजिकल्स अँड बायोलॉजिकल्स मर्या., बुलंदशहर, उत्तरप्रदेश अशी त्यांची नावं आहेत.

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन बायोफार्मा ही महाराष्ट्र राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी पूर्वतयारी करीत आहे. हे उत्पादन हाफकिन कंपनीच्या परळ येथील संकुलात केले जाईल.

हाफकिन बायोफार्माचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड म्हणाले की एका वर्षात कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

“आम्हाला या कामासाठी आठ महिन्यांचा कालावधी मंजूर करण्यात आला असून लस उत्पादनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे - महत्त्वाचा औषधी भाग आणि अंतिम औषध उत्पादन. लसीसाठीचा महत्त्वाचा औषधी भाग तयार करण्यासाठी आम्हाला जैव सुरक्षा पातळी 3 (BSL 3) ची यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे, तर फिल फिनिश अर्थात अंतिम औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे यापूर्वीच स्थापन झालेली आहे,” असे वैद्यकीय शाखेची पदवी घेतल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केलेले राठोड म्हणाले. BSL 3 ही सुरक्षा प्रमाणन यंत्रणा असून ती प्रामुख्याने सूक्ष्म जंतूंचा वापर केल्या जाणाऱ्या कामाच्या ठिकाणी आवश्यक असते.अन्यथा श्वासाद्वारे सूक्ष्म जंतूचा शरीरात प्रवेश होऊन गंभीर आजार होऊ शकतात.

सरकारी क्षेत्रातील मालमत्तांचा वापर करून लस उत्पादन क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा आपल्या देशातील लस उत्पादन क्षमता बांधणीसाठी दीर्घकाळ उपयोग होईल आणि देशात सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला ही क्षमता बांधणी सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि BIRAC अर्थात जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी या संदर्भात बोलताना केले. COVAXIN बाबत मोठी दिलासादायक बातमी; SARS-CoV-2 सोबतच Double Mutant Strain वरही प्रभावी असल्याचा निष्कर्ष ICMR कडून जारी.

हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशन मर्या. ही कंपनी, प्लेगच्या आजारावरील लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्देमर हाफकिन या रशियन सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञाच्या नावावरून नामकरण करण्यात आलेल्या आणि 122 वर्षांची परंपरा असणाऱ्या हाफकिन संस्थेची शाखा आहे.