बायोलॉजिकल-ई (Biological-E) तयार करत असलेली आरबीडी प्रोटीन सब युनिट व्हॅसिन Corbevax ही भारतातील सर्वात स्वस्त लस ठरू शकते. परंतु, अद्याप या लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली नाही. Corbevax ही लस Hepatitis B लसीसारखी बनवली असून पारंपारिक पद्धतीने तिचा वापर केला जाईल, अशी माहिती नॅशनल स्कूल ऑफ ट्रोपिकल मेडिसिनच्या डीन Dr Maria Elena Bottazi यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
Corbevax लस उत्पादन करण्यासाठी फक्त 110 रुपयांचा खर्च येतो. या लसीच्या दोन्ही डोसेसची किंमत 400 रुपयांपर्यंत देखील असू शकते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या वापरात असलेली सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड लसीचा एक डोस राज्य सरकारला 300 रुपयांना आणि खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळत आहे. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा एक डोस राज्य सरकारला 400 रुपयांना आणि खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांना मिळत आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस 995 रुपयांना मिळत आहे. वरील लसींच्या किंमतीच्या तुलनेत Corbevax लसीची संभाव्य किंमत कमी आहे.
दरम्यान, कोविड-19 लस Corbevax च्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने बायोलॉजिकल-ई सोबत करार केला आहे. यासाठी सरकारकडून बायोलॉजिकल-ई कंपनीला 1500 कोटी रुपयांचे अॅडव्हान्स पेमेंट करण्यात आले आहे. बायोलॉजिकल-ई कडून ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान या लसीचे 30 कोटी डोसेस तयार करण्यात येणार आहेत.
सध्या देशात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटची कोविशिल्ड या दोन लसी लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असून लसीच्या उत्पादनासाठी देखील सीरम इंस्टीट्यूटला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर ही लस देखील लसीकरण मोहिमेत सहभागी होईल. त्यात आता Corbevax लसीची देखील भर पडणार आहे. दरम्यान, देशातील लसीकरण डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होईल, असे सरकारने सांगितले आहे.