Prone Position Breathing म्हणजे काय? गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल?
Proning | Photo Credits: Pixabay.com

कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेक रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खालावत असल्याने त्रास होत असल्याचं समोर येत आहे. ही अवस्था रूग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांसाठीदेखील चिंताजनक आहे. जर तुम्ही कोविड 19 च्या निदानानंतर गृहविलगीकरणामध्ये असाल आणि तुम्हांला श्वसनाला त्रास जाणवत असेल तर तुम्ही पुढील वैद्यकीय मिळेपर्यंत Prone Position Breathing करून ऑक्सिजन पातळी सुधारू शकता असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिला आहे. ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी नेमकी ही Prone Position Breathing करायची कशी, कुठे आणि कोणी करायची याची एक नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. COVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी? रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत.

सध्या कोरोना रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने हॉस्पिटलवरीलही ताण वाढला आहे. दरम्यान ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची देखील कमतरता असल्याने अनेकदा रूग्णांची बेड शोधेपर्यंत हालत अजूनच खराब होऊन उपचारापूर्वीच रूग्ण दगावत असल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या डॉक्टरांकडूनही नियमित ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केले जात आहे. 6-Minute Walk Test: घरच्या घरी जाणून घ्या तुमच्या फुफ्फुसाची स्थिती; आरोग्य विभागाने सांगितली सोपी चाचणी.

प्रोनिंग (Proning)म्हणजे काय?

पालथे झोपणे ही प्रोनिंग स्थिती असते. या स्थितीत झोपल्याने ऑक्सिजनेस सुधारण्यात मदत होते असे वैद्यकशास्त्र सांगते. रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा प्रोनिंग अर्थात पालथे झोपण्याची स्थिती लाभदायक ठरते असे सांगितले जाते. गृहविलगीकरणात असलेल्या रूग्णांची ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा खाली जात असेल त्याला पोटावर झोपवा. यामुळे व्हेंटिलेशन सुधारते.

Prone Position Breathing साठी काय आवश्यक आहे?

प्रोनिंग साठी 4-5 उशा आवश्यक आहेत. मानेखाली 1, अजून 1-2 छातीच्या खाली आणि मांड्यांजवळ तर उर्वरित 2 गुडघ्याच्या खाली ठेवा. तुमची झोपण्याची पद्धत दर 30 मिनिटांनी बदलत रहा.

Prone Position Breathing कोणी करू नये आणि काय लक्षात ठेवाल?

गरोदरपणात, Deep venous thrombosisचे मागील 48 तासांत उपचार झाले असल्यास, हृद्याचे गंभीर आजार असल्यास, पाठीचा कणा स्थिर नसल्यास, मांडीच्या हाडाला, ओटीपोटाचा भागाला फ्रॅक्चर असल्यास Prone Position Breathing चा पर्याय टाळा. तसेच जेवणानंतर लगेच तासाभरात हे टाळा. विविध सायकल्स मिळून 16 तासांपर्यंत प्रोनिंग करता येऊ शकतं. या दरम्यान काही दबाब किंवा इजा होत असल्यास त्याची नोंद घ्या.