मागील महिनाभरापासून सक्तीने घरी बसावे लागल्याने सर्वांचीच पंचाईत झाली आहे. अर्थात आपल्या स्वतःच्या भल्यासाठी हे घरी राहणे फायद्याचे असले तरीही घरी बसून करायचे काय हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. अनेक मंडळी या लॉक डाऊन (Lockdown) च्या वेळात विविध रेसिपीज करण्याकडे भर देत आहेत. याचा फायदा असा की वेळही चटकन निघून जातो आणि आपल्या जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात. पण दुसरीकडे याच गोष्टीचा तोटा विचारात घेतल्यास हे चमचमीत पदार्थ खाल्ल्यावर ते पचवण्याची शक्ती मात्र कमी होत आहे. म्हणजेच नेहमी कितीही खाल्लं तरी कामाच्या, प्रवासाच्या घाईगडबडीत हे अन्न पचवण्यात जरा कमी कष्ट पडतात. पण आता तर लॉक डाऊन असल्याने हे खाल्लेले अन्न पचवणे ही मोठी समस्या होऊन बसली आहे. या अपचनावर (Indigestion) वेळीच उत्तर न शोधल्यास पुढे सततची अॅसिडिटी (Acidity), बद्धकोष्ठ, उलटी, जंत, पोटातील दुखणे यासारखे अन्य त्रास सुद्धा उद्भवू शकतात. पण काळजी करू नका यावर काही सोप्पे आणि घरगुती उपाय आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
अपचनावर घरगुती उपाय
-तुळशीची पाने चावा
अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर पाच ते सहा तुळशीची पाने कच्चीच खा. यामुळे पोटाचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होते.
- जिऱ्याचे पाणी
कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर घालून प्या. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. जिऱ्याचे दाणे पाण्यात भिजवत ठेवून सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास सुद्धा बराच परिणाम जाणवतो.
- हिंग पावडर किंवा पेस्ट
एक ग्लास गरम पाणी आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घाला आणि चिमूटभर काळं मीठ घालून हे पाणी प्या यामुळे चटकन आराम मिळतो. खूपच त्रास होत असल्यास कोमट पाण्यात हिंगाची पावडर मिसळून याची पेस्ट पोटाला लावा. यामुळे गॅसचा त्रास कमी होतो. Health Tips: पोटातील गॅस चारचौघात मान खाली घालायला लावण्याआधीच 'या' घरगुती उपायांनी करा इलाज
- आलं आणि लिंबू
1-1 चमचा आल्याचा रस आणि लिंबाचा रस घ्या आणि नीट मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. हा रस शरीरात डिटॉक्स म्हणून सुद्धा काम करतो.
- मेथी दाणे आणि काळे मीठ
जेवणानंतर मेथीचे दाणे आणि त्यात काळे मीठ मिक्स करून खावे त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. मेथी दाणे आणि काळे मीठ भाजून तुम्ही एकदाच तयार करून महिन्याभरासाठी साठवून ठेवू शकता, याचा उपयोग मुखवास म्हणून सुद्धा होतो.
दरम्यान, अपचनाचा त्रास हा तसा फार गंभीर आजार नाही पण म्हणून त्याला हलक्यात घेणे चुकीचे ठरेल, हा त्रास पूढे जाऊन अन्य पोटाच्या विकारात सुद्धा बदलू शकतो. असे होण्याच्या आधीच खबरदारी म्ह्णून आपल्या आहारात संतुलन बाळगा. आणि जिभेचे चोचले पूर्वतना पोटाची काळजी घ्यायला विसरू नका.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये. अधिक त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम )