उन्हाळाच्या (Summer 2020) सिझनची सुरुवात झाली की आंबा आणि कैरीच्या (Raw Mango) प्रेमींसाठी जणू काही सोहळाच सुरु होतो. उन्हाळयात अंगाची होणारी लाहीलाही हा कितीही त्रासदायक मुद्दा असला तरी उन्हाळयातच येणाऱ्या कैरीच्या आशेने सर्व जण दरवर्षी या सीझन ची वाट पाहत असतात. रसरशीत कैरी त्यावर मीठ आणि मसाला सोबत चाट मसाला वैगरे भुरभुरून खाल्ला तर.. वाचतानाही तोंडाला पाणी सुटतंय ना. तुम्हा आम्हा सर्वांचं हे कैरी प्रेम वाढवण्यासाठी आज आपण या फळाविषयी काही भन्नाट माहिती जाणून घेणार आहोत. मुळातच कैरी आंबट असल्याने इच्छा असतानाही अनेक जण सर्दी, खोकल्याच्या भीतीने या कैरीचे सेवन करणे टाळतात, पण बघायला गेल्यास प्रमाणात कैरी खाण्याचे शरीराला खूप फायदे होऊ शकतात. डोक्यावरील केसानपासून ते त्वचे पर्यंत तसेच पोटाचे विकास, रक्तदाब, पचनक्रिया एकंदरीत सर्वच बाबतीत कैरी शरीराला गुणकारी सिद्ध होते. याच कैरीचे आपण कधीही न ऐकलेले काही गन आता फायदे आपण जाणून घेऊयात.
तत्पूर्वी एक लक्षात ठेवा कैरी चटपटीत लागली म्हणून ती तोंडावरचा ताबा सोडून खात राहू नका. अन्यथा गुणांच्या ऐवजी भलताच दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. पण जरा संयमाने खाल्ल्यास तुम्हाला सुद्धा खालील फायदे मिळू शकतात.. हापूस आंब्याव्यतिरिक्त रत्ना, रायवळ, तोतापुरी या आंब्याच्या जातींविषयी तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर
कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
शरीराला थंडावा
उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना कच्ची कैरी खाऊन शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्या असा सल्ला दिला जातो. कैरीच्या सेवनाने सुद्धा शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
कैरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते
अन्न पचन सुरळीत होते
कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा.अॅसिडीटी, हार्टबर्न, मळमळ हे त्रास सुद्धा दूर होतात.
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते
कैरीतील अॅन्टीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी त्वचा आणि केस हेल्थी बनवण्यात मदत करतात. अॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. परिणामि पिंपल्स, ऑईली स्किन अशा समस्या दूर होतात.
दातांचे आरोग्य आणि तोंडाची दुर्गंधी वर उपाय
तोंडाला दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत कैरीचं सेवन आवर्जून करावं.
(टीप - वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)