Health Tips: पोटातील गॅस चारचौघात मान खाली घालायला लावण्याआधीच 'या' घरगुती उपायांनी करा इलाज
Stomoch Ache Due To Gas (Photo Credits: Instagram)

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना खाण्यापिण्याच्या वेळेवर लक्ष देणे जमत नाही, परिणामी शरीराचे सगळे कार्यचक्र बिघडून सतत हा ना तो आजार डोके वर काढत असतो. यातही पोटाचे विकार तर अगदी कॉमन आहेत, यातील एक प्रकार म्हणजे गॅस. जेव्हा अन्नपचन सुरळीत होत नाही आणि सतत बद्धकोष्ठता सतावत राहते त्यावेळेस पोटात ऍसिडिक गॅसेस तयार होतात, यामुळे वारंवार करपट ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, पोटात मुरडा पडल्यासारखे वाटणे अशा अनेक समस्या उद्भवतात. हे गॅसेस अनेकदा गुद्द्वारे बाहेर पडतात, चारचौघात असा काही प्रकार घडल्यास काय होते हे काही आम्ही तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही, पण अर्थात यावर गॅस दाबून ठेवणे हा काही उपाय नाही असे केल्यास त्रास वाढून गुदमरल्यासारखे होऊ शकते, पण मग यावर नेमके करायचे तरी काय?

बाहेरील औषधे घेतल्याने होणारा ऍसिडिटीचा त्रास आणि नाही घेतल्यास आजाराचा त्रास या पेचात पडायचे नसेल तर शरीरासाठी उपयुक्त आणि अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या घरगुती उपायातून तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकाल. त्यासाठी फार लांब जाण्याची सुद्धा गरज नाही तुमच्या किचन मध्येच तुम्हाला हे उपाय दिसून येतील, कोणते? चला तर पाहुयात..

ओवा

पोटात मुरडा आल्यासारखे होत असेल तर ओवा हा तुमच्यासाठी नामी उपाय आहे. तळहातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. तुम्हाला गॅस पटकन जायला हवा असेल तर तुम्ही ओवा चावताना त्यावर गरम पाणी प्या.

गुळ खा

दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.

आल्याचा तुकडा

अनेकदा अॅसिडीटी आणि गॅस झाल्यावर मळमळल्यासारखे होते. त्यावर तुम्हाला आराम हवा असेल तर तुम्ही आल्याचा तुकडा चघळू शकता. आलं चघळून त्याचा चोथा होईपर्यंत तुम्ही त्याचा रस प्या. त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धीतकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.

बडीशेपचं पाणी

1 कप उकळलेल्या पाण्यात 1  चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात ३ वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.

लिंबू पाणी

रोज गरम पाण्यातून लिंबाचा रस घेत असाल तर तुम्हाला पोटासंदर्भातील विकार होण्याची भीती बाळगायची काहीच गरज नाही.

पोटातील गॅसेस हा असा त्रास आहे की ज्यात आपल्याला अनेकदा नेमकं काय होतय हे कळत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला पोटात अचानक दुखायला लागत असेल. पोट साफ होत नसेल, अपचन ,ऍसिडिटी होत असेल तर तुम्हाला गॅसचा त्रास आहे हे समजून घ्या. आणि मग त्यावर यातील उपाय आजमावून पाहू शकता, महत्वाचे म्हणजे उपायनपेक्षा काळजी बरी असे आपल्याकडे मानले जाते, त्यामुळे तुमच्या जीवनशैलीला सुधारण्यावर सुद्धा लक्ष द्या.