Tripurari Purnima 2023 Date: 26 की 27 नोव्हेंबर यंदा त्रिपुरारी पौर्णिमा, देव दिवाळी कधी होणार साजरी?
त्रिपुरारी पौर्णिमा । File Image

कार्तिक पौर्णिमेचा (Kartiki Purnima) दिवस हा 'त्रिपुरारी पौर्णिमा' (Tripurari Purnima) म्हणून साजरी केली जाते. दिवाळी सणानंतर या पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा अनेक ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते. घराघरामध्ये, अनेक ठिकाणी घाटावर, मंदिरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आकर्षक आरास करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. हा दिवस हिंदू धर्मीय देव दिवाळी (Dev Diwali) म्हणून देखील साजरा करतात. पुराण कथेतील माहितीनुसार त्रिपुरारी पौर्णिमेला, भगवान शंकर, भगवान विष्णू यांची रात्री 12 वाजता भेट होते. त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेला बेल आणि भगवान विष्णूची प्रिय तुळस अर्पण करण्याची देखील रीत आहे.

यंदा पौर्णिमेची तिथी दोन दिवसांमध्ये आली आहे. 26 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौणिमा दुपारी 3 वाजून 53 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर या पौर्णिमेची सांगता 27 नोव्हेंबरला 2 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे उदय तिथी नुसार कार्तिकी पौर्णिमा 27 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

देव दिवाळी कधी?

कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते. यंदा देव दिवाळी कार्तिकी पौर्णिमेच्या आधी एक दिवस साजरी केली जाऊ शकते. 26 नोव्हेंबरला अनेक ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ शकते. पौर्णिमा तिथी प्रदोष काळामध्ये असताना देव दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या नियामानुसर काही जण देव दिवाळी 26 नोव्हेंबरला साजरी करणार आहेत.

हिंदू धर्माच्या माहितीनुसार, देव दिवाळी दिवशी देव धरती वर येतात. त्यांच्यासाठी भाविक दीपदान करतात. या रात्री लक्ष्मी पूजा करून चंद्रालाही अर्ध्य दिलं जातं.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला असून त्यामधील माहितीची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.