लुसलुशीत इडली, कुरकुरीत मेदुवडा किंवा भला मोठा डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ (south Indian Dishes) म्हणजे फास्ट फूडचं पौष्टिक व्हर्जन म्हणायला हरकत नाही मात्र या पदार्थाना खरी चव येते ती त्यासोबत सर्व्ह केल्या जाणाऱ्या आंबटगोड चवीच्या सांबारानेच (Sambhar). हे सर्व चविष्ट पदार्थ जरी आज दक्षिणेची खासियत मानले जात असले तरी याचा मूळ संबंध मराठा साम्राज्याचे (Maratha) छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांच्याशी जोडला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का? 1657 साली आजच्या दिवशी म्हणजे 14 मे ला छत्रपती शिवरायांना (chatrapati Shivaji Maharaj) पुत्र प्राप्ती झाली. स्वराज्याचे शिलेदार संभाजी महाराज यांची यंदा 362 वी जयंती आहे. यानिमित्ताने संभाजी महाराजांचा खवय्या स्वभाव व सांबार या पदार्थाशी असलेल्या संबंधाविषयी जाणून घेऊयात..
संभाजी आमटीचा सांबार कसा झाला?
डाळ आणि भाज्या एकत्र करून बनवल्या जाणाऱ्या सांबाराचा शोध हा थेट तंजावरच्या स्वयंपाक घरात लागल्याचे सांगितले जाते. एकदा शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांचे वंशज असणाऱ्या शहाजी राजांना जेवण बनवण्याची लहर आली असता त्यांनी सरळ शाही किचन मध्ये प्रवेश घेत आमटी बनवण्याचे ठरवले. आमटी हा पदार्थ साधारण डाळीच्या तुलनेत किंचित आंबट चवीचा बनवण्यासाठी यात मुख्यतः आमसूल वापरण्याची पद्धत आहे मात्र काहीतरी वेगळा प्रयोग करायचा म्हणून शहाजी महाराजांनी तुरीच्या दलित चिंचेचा कोळ टाकून हा पदार्थ बनवला. याच दिवशी संभाजी महाराज हे जेवणासाठी येणारे प्रमुख अतिथी होते, त्यांनी हा पदार्थ चाखल्यावर त्यांना तो प्रचंड आवडला आणि तेव्हाच संभाजी महाराजांच्या नावावरून या पदार्थाला संभाजी आमटी असे नाव देण्यात आले. पुढे अपभ्रंश होतं होतं त्या आमटीचे नाव संभाजी सारम, सांभारम आणि आता सांबारम झाले.
ही कथा जरी इतिहासकारांनी मांडली असली तरी यावरून देखील बरेच भेद आहेत , यात काहींच्या म्हणण्यानुसार सांबार हा पदार्थ शहाजींनी नसून संभाजीनीच बनवला असल्याचे देखील मानले जाते. एकदा मुख्य शाही खानसामा रजेवर असताना संभाजी महाराजांनी स्वतःसाठी डाळ बनवण्याचा निर्णय घेतला व त्यावेळी त्यांनी तुरडाळीत चिंचेचा कोळ वापरून हा पदार्थ तयार केला असे काही कथांमध्ये आढळून येते.
कालांतराने हा पदार्थ दाक्षिणात्य प्रदेशात प्रसिद्ध झाला व त्याचबरोबर प्रत्येकजण यात आपला टच देत वेगवेगळ्या पद्धती वापरून तयार करू लागला. यासंदर्भातील माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यानेच लाइफस्टाइल वाहिनीवरील ‘करीज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात दिली आहे. . दक्षिणेमध्ये राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवला आली त्याचा त्या काळचा राजा संभाजी यांच्या नावावरून या पदार्थाला सांबार हे नाव देण्यात आले ‘त्यामुळे यापुढे कधीही तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य उपहारगृहामध्ये सांबार खात असाल तर तुम्ही खरं म्हणजे एक मराठमोळा पदार्थ खाताय हे लक्षात ठेवा.’असे देखील कुणाल कपूर याने सांगितले.