Avadhoot Gupte and Santosh Juvekar | X@Avadhoot Gupte

लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित 'छावा' या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमात संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल आहे. पण या सिनेमामध्ये अनेक मराठी कलाकार मंडळी देखील आहेत.अशातच एक संतोष जुवेकर होता. संतोषने या सिनेमातील त्याच्या भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर मुलाखती देताना केलेल्या काही विधानांवरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे. या ट्रोलिंग वर अनेक मराठी कलाकारांनी आता संतोषच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष जुवेकरचा सिनेसृष्टीतील घट्ट मित्रांपैकी एक अवधूत गुप्तेने संतोषची पाठराखण करत ट्रोलर्सने सुनावलं आहे.

अवधूत गुप्तेची पोस्ट

अवधूत गुप्ते याने ट्रोलर्सना सुनावताना त्याच्या संघर्षाकडे बघण्याचा सल्ला दिला आहे. 'दगडावर उमलू पाहणार्‍या फुलाचा संघर्ष कबरीवरच्या बुरशीला कसा कळणार?'असं म्हणत त्याने ट्रोलर्सला सुनावलं आहे. ' ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं.' असं अवधुतने म्हटलं आहे.

संतोष जुवेकर याची प्रतिक्रिया

संतोष जुवेकर सध्या ट्रोलर्सच्या रडार वर असला तरीही त्याने ही टीका सकारात्मक घेतली आहे. त्याने कुठेही तक्रार नोंदवलेली नाही. पण युट्युबर करण सोनावणे च्या 'focusedindian' वरील एका व्हिडिओत करणला प्रतिक्रिया देताना संतोषने आपण जे विधान केलं ते चूकीच्या पद्धतीने घेतलं गेलं आणि त्यामधून आता ते ट्रोलिंग सुरू झालं आहे. असं संतोष म्हणाला आहे.

अवधूत गुप्ते प्रमाणेच संतोषच्या पाठीशी रुचिरा जाधव, धनंजय पोवार देखील उभे राहिले आहेत.