Pandharpur Wari 2019: आषाढी वारी मध्ये माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान; कशी आणि कोणी सुरू केली प्रथा?
Mauli Palkhi File Photo (Photo Credits: commons.wikimedia)

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2019: आषाढ महिन्याला सुरूवात झाली की वारकर्‍यांना आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi) वेध लागतात. महाराष्ट्रासह देशा-परदेशातून वारकरी, माळकरी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी, पंढरपूर वारी मध्ये (Pandharpur Wari 2019)  सहभागी होण्यासाठी हजर होतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूमधून संत तुकारामांची (Sant Tukaram) तर आळंदीहून अष्टमीला संत ज्ञानेश्वरांची (Sant Dnyaneshwar) पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवते. आषाढी वारी २०१९ मध्ये हा सोहळा 24 आणि 25 जून दरम्यान रंगणार आहे. आज (25 जून) दिवशी आळंदीहून ज्ञानेश्वर म्हणजे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरूवात होणार आहे. दरवर्षी तुकाराम आणि ज्ञानेश्वरांची पालखी वेगवेगळा प्रवास करून पंढरपुरात दाखल होतात. पहा माऊलींच्या पालखी 2019 चं संपूर्ण वेळापत्रक 

संत ज्ञानेश्वरांच्या पालखी कधी आणि कशी सुरू झाली?

पूर्वी नियमित आधी तुकोबांची आणि त्यानंतर माऊलींची पालखी पंढरपूरला प्रस्थान करत असे. मात्र दरम्यान तुकोबांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून आणि सेवेच्या प्रश्नावरून वाद सुरू झाला. अशावेळी माऊलींचे भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी ज्ञानोबांची स्वतंत्र पालखी आळंदीहून नेण्यास सुरूवात केली.

हैबतराव हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या सेवेत होते. सातपुडयातून प्रवास करताना भिल्लांनी त्यांची संपत्ती लुटून त्यांना गुहेत कोंडले. अशावेळेस केवळ पंढरीचा विठोबा आपला आधार आहे अशा भावनेने हैबतबाबांनी अखंड हरिपाठाचं पठण सुरू केले. योगायोगाने 21 व्या दिवशी भिल्लनायकाच्या पत्नीला मुलगा झाला, या आनंदात भिल्लनायकाने हैबतबाबांची मुक्तता केली. हैबतबाबा त्यानंतर माऊलींच्या सेवेत आळंदीतच राहिले. हैबतबाबा आरफळकरांनी पंढरपूरच्या वारीला संरक्षण आणि भव्य रूप मिळावे म्हणून शिंदे संस्थानकडे राजाश्रयाची मागणी केली. बेळगावच्या शितोळे सरकारांना ही व्यवस्था करण्यास सांगितले. शितोळे सरकारांनी मोठया आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. आजतागायत या कुटुंबाकडून वारीची सेवा होते. यंदादेखील वारीच्या अश्वांची सोय कडून करण्यात आली आहे. Mauli Palkhi 2019: आळंदी हून संत ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थानापूर्वी अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना (Watch Video)

आळंदीमध्ये विधीवत पूजा झाल्यानंतर पालखी मंदिराबाहेर पडते. सूर्यास्ताच्या वेळेस पालखी माऊलींच्या आजोळी म्हणजे गांधी वाड्यात पोहचते आणि हळूहळू पुढे मार्गस्थ होते.