2018 मध्ये शेतकर्‍यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ; Suicide च्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालात आत्महत्येशी (Suicide) संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार सन 2018 मध्ये बेरोजगारीमुळे (Unemployment) झालेल्या आत्महत्यांच्या संख्येने शेतकरी आत्महत्यांनाही मागे टाकले आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार सन 2018 मध्ये शेतकऱ्यांपेक्षा अधिक बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत.

2018 मध्ये, बेरोजगारीमुळे 12,936 लोकांनी आत्महत्या केली. मागच्या वर्षीच्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 10,349 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसरीकडे 1 जानेवारी 2009 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत 81,758 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये, फक्त पाच वर्षांत 57% विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एनसीआरबीच्या अहवालानुसार, मागील वर्षी देशभरात 1.3 लाख लोकांनी आत्महत्या केली, ज्यात 8% विद्यार्थी होते.

गृह मंत्रालयांतर्गत नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो या संस्थेने गुन्ह्याशी संबंधित आकडेवारी नुकतीच सादर केली, जी आश्चर्यकारक आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2018 मध्ये देशात आत्महत्यांच्या घटनांमध्ये 3.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार 2018 मध्ये आत्महत्येचे 1 लाख 34 हजार 516 गुन्हे नोंदविण्यात आले होते, तर 2017 मध्ये 1 लाख 29 हजार 887 लोकांनी आत्महत्या केल्या.

सन 2017 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, बेरोजगारीने त्रस्त झालेल्या 12 हजार 241 जणांनी आत्महत्या केली होती, तर शेतीत झालेल्या नुकसानीमुळे पीडित 10, 655 लोकांनी मृत्यूला मिठी मारली होती. 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये शेतकर्‍यांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. 2016 मध्ये 11 हजार 379 शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली होती.

अहवालानुसार महिलांपेक्षा पुरुषांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली आहेत. आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास बेरोजगारीने कंटाळलेल्या 82 टक्के पुरुषांनी आत्महत्या केली. बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याच्या बाबतीत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये 1585 लोकांनी आत्महत्या केली आहेत. त्यानंतर तामिळनाडू (1579), महाराष्ट्र (1260), कर्नाटक (1094) आणि उत्तर प्रदेश (902) मध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. (हेही वाचा: वाशिममध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची विद्युत तारेला पकडून आत्महत्या)

अहवालानुसार, 2018 मध्ये एकूण 1,34,516 लोकांनी आत्महत्या केली, जी 2017 मधील 1,29,887 आत्महत्येच्या तुलनेत 3.6 टक्के जास्त आहे. सर्व प्रकारच्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्रा (17,972) एक नंबरवर आहे. त्यानंतर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.