वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज खुर्द येथील एका शेतकऱ्याने विद्युत तारेला पकडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश रामसा कट्यारमल (वय 55), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश गुरुवारी रात्री 12 वाजता कोणालाही न सांगता शेतात गेले होते. परंतु, सकाळ झाली तरी त्यांच्याबद्दल काहीचं माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोध घ्यायला सुरूवात केली. दरम्यान, सुरेश यांचा मृतदेह शेतात पडलेला आढळून आला. त्यावेळी त्याच्या हातात सर्व्हिस लाइनचा केबल होता.
सुरेश यांच्यावर गावातील सहकारी सोसायटीचे दीड लाखांचे कर्ज आहे. तसेच त्यांनी सावकाराकडूनही एक लाख रुपये घेतले होते. अवकाळी पावसामुळे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. सुरेश यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले आहेत. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी खचले आहेत. यातील काही शेतकरी आत्महत्या करून आपले जीवन संपवत आहेत. (हेही वाचा - वाशिम: शाळेतील वर्गमित्राने विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याने आत्महत्या)
यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांचे कोरड्या तसेच ओल्या दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्याचे खरीप हंगामातील पिक वाया गेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून सत्तास्थापनेचा पेच निर्माण होईपर्यंत राज्यात तब्बल 306 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त 306 शेतकऱ्यांपैकी 56 प्रकरणे मदतीस पात्र ठरली असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.