भारत मागील 6-7 महिन्यांपासून कोविड 19 व्हायरसमुळे फैलावत असलेल्या कोविड 19 आजाराचा सामना करत आहे. झपाट्याने पसरणार्या या आजाराचं उगमस्थान चीन असल्याचं सांगितलं जात असलं तरीही आता सारे जग त्याचा सामना करत आहे. थुंकीद्वारा बाहेर पडणार्या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात आलात तर त्याची बाधा होऊ शकते आणि हा कोरोना प्रजातीमधील व्हायरस विविध वस्तूंवर, विविध कालमर्यादेपर्यंत जीवंत राहू शकतो त्यामुळे त्याच्या फैलावाचा धोका अधिक आहे. आता या आजाराला रोखण्यासाठी भारतासह जगभरात लस आणि ठोस उपचार शोधण्याचे वैज्ञानिक, संशोधक कसोशीने प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारत हा मुख्य दावेदारांपैकी एक असल्याने जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. दरम्यान भारतामध्ये विविध लसी आता अंतिम टप्प्यांत असल्याने जर भारताकडे यशस्वी लस उपलब्ध झाली तर नागरिकांना लसीकरण कसे होणार? प्राधान्यक्रम काय असेल? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आहेत. पण काल (21 ऑक्टोबर) Grand Challenges Annual Meeting मध्ये ऑनलाईन सहभाग घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लस कशी पोहचवली जाणार याबद्दल संकेत दिले आहेत. दरम्यान मोदींनी Digital Health ID चा वापर करत भारतामध्ये नागरिकांच्या COVID Immunisation चं ट्रॅकिंग ठेवलं जाऊ शकतं, असे सांगितले आहे. COVID-19 Vaccine Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड-19 लसीच्या वितरणाचा आढावा; जलद पुरवठ्यासाठी पूर्वतयारीकडे विशेष लक्ष.
Digital Health ID याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी माहिती दिली होती. National Digital Health Mission ची लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये माहिती देताना त्यांनी Digital Health ID चा देखील उल्लेख केला होता. लवकरच भारतीयांना हे Digital Health ID उपलब्ध करून दिले जाऊ शकते. 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' . या योजनेअंतर्गत आता प्रत्येक भारतीयाचे एक हेल्थ आयडी (Health Id) बनवले जाणार आहे. त्यामध्येच आता तुम्हांला कोविड 19 ची लस दिली आहे की नाही? डोस कधी, कुठे दिला? याची माहिती देखील नोंदवली जाऊ शकते. अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही. मात्र कोरोना बाधित देशांच्या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या भारतासमोर कोविडच्या लसीकरणाचेही मोठे आव्हान आहे. National Digital Health Mission: 74 व्या स्वातंत्र्यदिनी भारतात सुरू झालेल्या 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' ची जाणून घ्या वैशिष्ट्य!
लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणा, आर्थिक पाठबळ, लस सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज चेन उभारणं ही आव्हानं आहेत. मात्र लसीकरण लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे देण्यासाठी सरकारी यंत्रणा रोड मॅप बनवत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Health ID card कशासाठी?
- भारतीयांना नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत आता हेल्थ आयडी कार्ड दिले जाईल.
- प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जाताना, फार्मसीमध्ये गेल्यावर या कार्डच्या माध्यामातून लॉग ईन करता येईल.
- डॉक्टरांची अपॉंईटमेंट ते औषधं याची माहिती हेल्थ प्रोफाईलच्या माध्यमातून बनवली जाईल.
- दरम्यान प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती ही गुप्त ठेवली जाणार आहे.
- डॉक्टरांना लिमिटेड टाईम अॅक्सेस दिला जाणार आहे. तसेच त्यासाठी वेगळी सोय असेल.
- देशातील कुठल्याही काना कोपर्यामधून कार्ड वापरून टेलि फार्मसी, टेलि मेडिकलचा वापर करून आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल.
भारतामध्ये आता सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा खालावत आहे. अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी करत देशाचा कोविड 19 रिकव्हरी रेट सुधारण्याला भारताला यश आलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने असेच काम सुरू राहिल्यास आणि नागरिकांनी काळजी घेतल्यास फेब्रुवारी 2021 मध्ये भारतामधील कोरोना व्हायरसच्या अॅक्टिव रुग्णांची संख्या कमी होऊन 40,000 हजारांवर येऊ शकते असा विश्वास देखील काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बोलून दाखवला आहे.