Indian Railway | Photo Credits : PTI

भारतामध्ये कोरोना व्हायरसचं संकट हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं चित्र असल्याने आता केंद्राने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यास सुरूवात केली आहे. आज (1 मे) केंद्रीय गृह विभागाने देशात अडकलेल्या मजुर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य लोकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी भारतीय रेल्वे सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. दरम्यान कोव्हिड 19 ची सद्यस्थिती पाहता त्यासाठी विशेष गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. लवकरच त्यासाठी तिकीट बुकिंग आणि अन्य सूचना जारी केल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात 3 मे नंतर कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन झोननुसार मोकळीक मिळू शकते: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत.

स्पेशल ट्रेन्स चालवण्यासाठी आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नोडल ऑफिसर जबाबदारी सांभाळेल. हा ऑफिसर दोन राज्यांमधील, केंद्रशासित प्रदेशांमधील समन्वयक असेल. याप्रवासामध्येही किती जणांना परवानगी दिली जाऊ शकते, रेल्वे स्थानकावर, ट्रेन मध्ये सुरक्षेचे नियम काय असतील? सोशल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाऊ शकतं? याची सुस्पष्ट नियमावली दिली जाणार आहे. दरम्यान या स्पेशल ट्रेन्स दोन्ही राज्यांची गरज पाहून एका स्थानकातून दुसर्‍या स्थानकात चालवली जाईल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ANI Tweet

सुमारे 15 दिवसांपूर्वी पहिल्या लॉकडाऊनच्या संध्याकाळी मुंबईत वांद्रे स्टेशनवर अचानक गर्दी केली होती. त्यावेळेस मजुरांनी आम्हांला अन्न-पाणी नाही घरी परत जाण्याची सोय करा अशी मागणी पुढे आली होती. सध्या महाराष्ट्रात सुमारे 6 लाख स्थलांतरीत मजुरांना राज्यात विविध ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मजुरांनी मूळ गावी परत जाण्यासाठी लॉकडाऊनचे नियम मोडून प्रयत्न करू नयेत. लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्य तुम्हांला मूळ गावी सुरक्षित पोहचवेल असा विश्वास दिला होता. आता आज केंद्र सरकारने दिलेल्या माहितीमुळे स्थलांतरित मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याने दोन-तीन वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हीडीओ कॉन्फर्सिंगमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी विशेष ट्रेन चालवावी यासाठी मागणी केली होती.

आज तेलंगणा शहरात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थ्यांसाठी लिंगमपल्ली ते हटिया दरम्यान पहिली विशेष ट्रेन धावली आहे.