जयपूर शहरात 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चारही आरोपींना फाशीची शिक्षा
Jaipur Bomb Blast (Photo Credits: Instagram)

जयपूर (Jaipur) शहरात 2008 साली मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 13 मे 2008 साली जयपूरात झालेल्या 8 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला होता. या हल्ल्यात 80 लोकांचा मृत्यू झाला होता तर 176 लोक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून पाचवा आरोपी शाहबाज हुसेन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते तर चार आरोपींना दोनच दिवसांपूर्वी 18 डिसेंबर रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. या चारही आरोपींना आज शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या 11 वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता. फाशी देणाऱ्या जल्लाद याला किती पैसे दिले जातात?

या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेनची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2008 साली झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या बॉम्बस्फोटातील 3 दहशतवाद्यांचा देशातील अन्य भागांत झालेल्या बॉम्बस्फोतही सहभाग असल्याचे आढळून आले होते.जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर प्रत्यक्षात न्यायालयात चार आरोपपत्रं दाखल करण्यात आली होती.

बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणारा जो ई-मेल पाठवण्यात आला होता तो शाहबाजने पाठवल्याचा आरोप होता. मात्र त्याच्या वकिलाकडील सबळ पुराव्यांमुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली. तर अन्य चार आरोपींना कलम 120 ब अन्वये दोषी धरण्यात आले आहे.